आष्टीत पुन्हा बिबट्याच्या थरार; पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यास बिबट्याने केले ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 19:50 IST2020-11-24T19:50:01+5:302020-11-24T19:50:31+5:30
वाघदरा शिवारातील शेतीत दुपारी तुरीला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला

आष्टीत पुन्हा बिबट्याच्या थरार; पिकांना पाणी देणाऱ्या शेतकऱ्यास बिबट्याने केले ठार
- नितीन कांबळे
कडा - सुर्डी गावापासून दुर अंतरावर असलेल्या वाघदरा शिवारातील शेतीत दुपारी तुरीला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली . नागनाथ गहिनिनाथ गर्जॅ (४० ) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या हल्ल्यामुळे आष्टी तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याचा थरार अनुभवायला येत असून शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.
आष्टी तालुक्यातील सुर्डी येथील शेतकरी नागनाथ गहिनिनाथ गर्जॅ हे गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या वाघदरा या शेतात तुरीला पाणी देण्यासाठी गेले होते. पाणी देत असताना अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवल्याने. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुपारपासून गेलेले गर्जॅ सायंकाळपर्यंत घरी परत न आल्याने नातेवाईकांनी शेतात पाहणी केली. यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांचा मृतदेह आढळून आला.
वन अधिकारी मधुकर तेलंग यांनी गर्जे यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाला असल्याचे स्पष्ट केले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग बुधवारपासून परिसरात पिंजरे लावेल अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, तालुक्यात बिबाट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर होत असून वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना जिव गमवावा लागत आहे असा संताप ग्रामस्थांमध्ये आहे. वनविभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय गोल्हार यांनी केली आहे.