नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर खड्ड्यात उलटला; चालक जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:43 IST2020-07-13T19:43:08+5:302020-07-13T19:43:21+5:30
एकजण गंभीर जखमी झाला आहे.

नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर खड्ड्यात उलटला; चालक जागीच ठार
कडा : नांदूर येथुन धनगरवाडीकडे जात असताना ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रोडवरून खड्यात उलटल्याने झालेल्या अपघातात चालक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. गणेश गहिनीनाथ विधाते (२३ ) असे मृताचे नाव असून मिनीनाथ गावडे हा गंभीर जखमी झाला आहे.
आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील गणेश विधाते नांदूर येथील मिनीनाथ लक्ष्मण गावडे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर घेऊन मिनीनाथ गावडेसोबत धनगरवाडीकडे जात होता. अचानक ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्यात उलटला. यात गणेशच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मिनीनाथ गावडे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अहमदनगर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. अंभोरा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.