दिंद्रुडजवळ राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वारास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 18:26 IST2020-12-24T18:24:36+5:302020-12-24T18:26:27+5:30
दुचाकीस्वारास चिरडल्यानंतर अनियंत्रित टिप्पर महामार्गाशेजारील लिंबाच्या झाडावर आदळला.

दिंद्रुडजवळ राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीस्वारास चिरडले
दिंद्रुड (बीड ) : परिसरात गेल्या कांही दिवसांपासुन दुचाकींच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अपघाताची ही मालिका सुरूच असून गुरुवारी सायंकाळी तेलगाव- दिंद्रुड महामार्गावर भरधाव टिप्परने एका दुचाकीस्वारास चिरडल्याची घटना घडली आहे. बाबू आबाजी निरडे ( ५२) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
बाबु आबाजी निरडे हे दुचाकीवरुन ( एम एच ४४ ई ६४७४) आपल्या गावी कचारवाडीकडे परतत होते. याच दरम्यान, परळीकडून भरधाव वेगात येणाऱ्या राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने ( एम एच २२ एए ५५४ ) नर्मदा जिनिंगजवळ त्यांना जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार निरडे टिप्परच्या खाली चिरडून जागीच ठार झाले. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वारास चिरडल्यानंतर अनियंत्रित टिप्पर महामार्गाशेजारील लिंबाच्या झाडावर आदळला. यात लिंबाचे झाड मुळासकट उन्मळून पडले आहे.
अपघाताची माहिती मिळताच दिंद्रुड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह धारुर येथील शासकीय रुग्णालयात हलवला आहे. अपघातानंतर टिप्पर चालक फरार झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.