The tightening of the system will take place in the month of 'nutrition' | ‘पोषण’ महिन्यात लागणार यंत्रणेचा कस
‘पोषण’ महिन्यात लागणार यंत्रणेचा कस

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कुपोषण निर्मूलनासाठी भारत सरकारच्या ‘पोषण अभियान’ महत्त्वाकांक्षी कार्यक्र मांतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी प्रकल्पात असणाऱ्या अंगणवाडी केंद्रामार्फत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविले जात असून, गतवर्षी अव्वल येणा-या जिल्ह्यातील यंत्रणेचा यंदा कस लागणार आहे. समुदाय आधारित उपक्रमांवर भर देत जिल्ह्यात सर्वत्र पोषण उत्सव सुरु असून या कार्यक्रमाच्या दैनंदिन नोंदी पोषण अभियानाच्या डॅश बोर्डवर आॅनलाईन होत आहेत.
जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास विभाग चंद्रशेखर केकान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांच्या मार्गदर्शन व नियोजनातून जिल्हाभर पोषण उत्सव सुरु आहे. सर्व अंगणवाडी, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, शाळांबरोबरच पालकांचा सहभाग वाढत आहे.
पोषण अभियानात सर्व अंगणवाडी कार्यकर्तींमार्फत मोबाईलच्या माध्यमातून कॅस अ‍ॅप्लिकेशन अंतर्गत सर्व रेकॉर्ड ,दैनंदिन नोंदी, वजन, उंची, आहार वाटप नोंदी आॅनलाईन होत आहेत. यातून आता वेळेवर पर्यवेक्षण होत आहे. सर्व अंगणवाडी केंद्रात सुपोषण दिवस, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य, गरोदर माता नोंदणी, ग्राम आरोग्य व पोषण दिवस असे नियमित कार्यक्र म होत आहेत.
पोषण महिन्यात सर्व अंगणवाडी, शाळा, ग्रामपंचायत, आरोग्य विभागाच्या वतीने एकत्रितरित्या बालकांचे एक हजार दिवस , रक्तक्षय, अतिसार, हात धुणे आणि स्वच्छता व पौष्टिक आहार या पंचसूत्रीवर घराघरात पोषण उत्सव साजरा होत आहे. यात किशोरवयीन मुली, बालके, गरोदर व स्तनदा माता ,सर्व स्त्रिया हे प्रामुख्याने लक्ष्य घटक आहेत.
सर्व एकात्मिक बालविकास अधिकारी, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, कार्यकर्ती, जिल्हा व तालुका गट समन्वयक, मदतनीसांची टीम हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करताना दिसून येत आहे.
पोषण उत्सवासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी उद्धव सानप, महादेव जायभाये, व्यंकट हुंडेकर, रामेश्वर मुंडे, सखाराम बांगर, थोरात, शोभा लटपटे, तांदळे, दहिवाळ, कदम, बुधुक, विस्तार अधिकारी अजय निंबाळकर, वैभव जाधव, जहागीरदार, किशोर आघाव, संतोष जगताप, पन्हाळे, जिल्हा पोषण अभियान समन्वयक भूषण विडले, चाळक, तिडके आदी परिश्रम घेत आहेत.
२०२२ पर्यन्त कुपोषण निर्मूलन, बाल व माता मृत्यू कमी करणे ,स्त्रिया व किशोरी यांचा अ‍ॅनिमिया कमी करणे ,जन्मत: कमी वजनाच्या बालकांची संख्या कमी करणे या सर्वांवर एकित्रत लक्ष्यप्राप्तीसाठी ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग ,माहिती व प्रसारण विभाग, समाजकल्याण विभाग ,अन्न व पुरवठा विभागाच्या एकत्रित अभिसरणातून ही मोहीम राबविली जात आहे. बालके ,किशोरी ,गरोदर व स्तनदा मातांची पोषण स्थिती सुधारण्यासाठी जनआंदोलन उभारुन समाजात पोषण व आरोग्याबाबत जनजागृती केली जात आहे.

Web Title: The tightening of the system will take place in the month of 'nutrition'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.