बीडमध्ये थरार! लग्न समारंभात पाहुणे बनून चोरी करणारी आंतरराज्य 'सिसोदिया गँग' गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:52 IST2025-12-16T15:48:52+5:302025-12-16T15:52:13+5:30
बीडमध्ये थरार! पोलिसांनी दरोडेखोरांचा मस्साजोगपर्यंत सिनेस्टाईल पाठलाग केला; नागरिकांच्या मदतीने टोळी जेरबंद.

बीडमध्ये थरार! लग्न समारंभात पाहुणे बनून चोरी करणारी आंतरराज्य 'सिसोदिया गँग' गजाआड
बीड : लग्न समारंभात पाहुणे किंवा भिकारी बनून दागिने चोरणे, तसेच अंगावर टोमॅटो सॉस टाकून नागरिकांचे लक्ष विचलित करत पाकीटमारी करणे, अशा आंतरराज्यीय गुन्ह्यांची 'मोडस ऑपरेंडी' (गुन्हा करण्याची पद्धत) असलेल्या टोळीला बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने पाठलाग करून अटक केली आहे. मध्यप्रदेशातील या टोळीने बीड, अंबाजोगाई आणि गेवराई परिसरात धुमाकूळ घातला होता.
बादल कृष्णा सिसोदिया (वय २४), काला उर्फ ऋतिक महेश सिसोदिया (वय २९), दीपक दिलीप सिसोदिया (वय २९) आणि जस्वंत मनिलाल सिसोदिया (वय २७) (सर्व रा. गुलखेडी, ता. पाचोर, जि. राजगड, मध्यप्रदेश) अशी पकडलेल्या आरोपींची नावे आहेत. या टोळीतील आरोपींची चोरी करण्याची पद्धत अत्यंत वेगळी होती. ते लग्न समारंभात पाहुण्यांच्या किंवा भिकाऱ्यांच्या वेशात जात दागिने चोरत. तसेच, बँकेतून पैसे काढणाऱ्या लोकांवर पाळत ठेवून त्यांच्या पैशांची बॅग हिसकावणे, तसेच अंगावर टोमॅटो सॉस टाकून नजर हटवून हातातील पैसे घेऊन पळून जाणे, अशा पद्धतीने ते नागरिकांची फसवणूक करत. १२ डिसेंबर रोजी हे चौघे चोरीच्या दुचाकी घेऊन केजमध्ये एका बॅग लुटण्याच्या इराद्याने आले होते, परंतु त्यांचा प्लॅन फसला. ते दोन विना क्रमांकाच्या दुचाकीवरून बीडकडे पळत होते. याच दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्यांचा संशय आला आणि पोलिसांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. यातील दोघांना पोलिसांनी जागीच पकडले, तर उर्वरित दोघांना मस्साजोगपर्यंत पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांना सामान्य लोकांनीही मदत केली. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी, मोबाइल असा एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीला अटक केल्याने या परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
या पथकाने केली कामगिरी
एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक महेश विघ्ने, बप्पासाहेब घोडके, राजू पठाण, महेश जोगदंड, युनूस बागवान, भागवत शेलार, गणेश मराडे आदींनी केली. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांनी त्यांना मार्गदर्शन केले.
लग्नात लहान मुलेही करतात चोरी
लग्न समारंभात याच सिसोदिया गँगमध्ये मोठ्यांसोबत लहान मुलेही असतात. नवरीच्या खोलीत अथवा गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या पर्स चोरी करण्याचे काम ही लहान मुले करतात. यापूर्वी बीड, आष्टीमध्ये असेच प्रकार घडले होते. तसेच छत्रपती संभाजीनगर पोलिसांनीही अशा प्रकारची टोळी पकडली होती. आता बीड पोलिसांनीही ही टोळी पकडली आहे. त्यांच्या साथीदारांचा शोध सुरू आहे.
नंदुरबारला चोरी करून बीडमध्ये प्रवेश
नंदुरबार जिल्ह्यात याच टोळीने बॅग लिफ्टिंग केली होती. तेच पैसे घेऊन हे चाेरटे बीड जिल्ह्यात आले होते. केजमध्ये एका बँकेत त्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला, परंतु यश आले नाही. त्यामुळे ते बीड शहरात येत होते. परंतु त्या आधीच त्यांना मस्साजोगजवळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या.