बीडमध्ये शेतीच्या वादातून तिघांचा धारधार शस्त्राने खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 14:05 IST2019-07-27T14:03:08+5:302019-07-27T14:05:36+5:30
भावांमध्ये शेतीचा वाद सुरु होता.

बीडमध्ये शेतीच्या वादातून तिघांचा धारधार शस्त्राने खून
बीड : येथून जवळच असलेल्या पिंपरगव्हाण रोड परिसरात शेतीच्या वादातून तिघांचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. किरण काशीनाथ पवणे, प्रकाश काशीनाथ पवणे, दिलीप काशीनाथ पवणे अशी मयतांची नावे आहेत. हे तिघेही वासनवाडी येथील रहिवाशी असून, त्यांची पिंपरगव्हाण रोडवर शेती आहे.
किसन पवणे व काशीनाथ पवणे या भावांमध्ये शेतीचा वाद सुरु होता. शुक्रवारी रात्रीच अॅड. कल्पेश किसन पवणे व डॉ. सचिन किसन पवणे यांनी आपल्या जीवाला धोका असल्याची फिर्याद बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यामुळे हा पूर्व नियोजित कट असल्याचे बोलले जात आहे. या दोघांवर खून केल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. हे दोघेही जिल्हा रुग्णालयात पोलीस निगराणीखाली उपचार घेत आहेत.
या प्रकरणातील किसन पवणे हे फरार असून, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. एक मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला आहे, तर इतर दोघांचे मृतदेह घटनास्थळावरुन आणले जात आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी भेट दिली आहे. पोलीस बंदोबस्तामुळे रुग्णालय चौकीला छावणीचे स्वरुप आले होते. सर्व वरिष्ठ अधिकारी या प्रकरणी शोध घेत आहेत.