शिरूर कासार येथे लाच घेताना तिघांना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:04 IST2019-12-11T00:04:11+5:302019-12-11T00:04:55+5:30
येथील ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाने पकडल्याची कारवाई होऊन बारा दिवस होत नाही तोच शिरुरच्या सहायक निबंधक कार्यालयात लाच घेणा-या सहायक निबंधकासह लेखापरीक्षक आणि मुख्य लिपिकाला ८ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

शिरूर कासार येथे लाच घेताना तिघांना पकडले
शिरुर : येथील ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना लाचलुचपत विभागाने पकडल्याची कारवाई होऊन बारा दिवस होत नाही तोच शिरुरच्या सहायक निबंधक कार्यालयात लाच घेणा-या सहायक निबंधकासह लेखापरीक्षक आणि मुख्य लिपिकाला ८ हजार ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. मंगळवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
आॅडीटच्या संबंधात झालेल्या तक्रारीच्या चौकशीमध्ये चांगला अहवाल देण्यासाठी शिरुर कासार येथील सहायक निबंधक संजय कारभारी सोनवणे, मुख्य लिपिक तुकाराम कोंडीबा वायबसे आणि लेखा परीक्षक पद्माकर अवधूत कुलकर्णी यांनी २७ नोव्हेंबर रोजी ८ हजार ५०० रुपयांची लाच मागितल्याची तक्रार फिर्यादीने केली होती. त्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ३ डिसेंबर रोजी खात्री केली असता लाचेची मागणी करुन स्विकारण्याचे संबंधितांनी मान्य केले होते. त्यानुसार १० डिसेंबर रोजी सहायक निबंधक कार्यालयात सापळा लावण्यात आला.
लाच घेताना तिघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया अपर पोलीस अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपुडे पाटील,अमोल बागलाने, प्रदिप वीर यांनी ही कारवाई केली.