परळी तालुक्यात वर्षभरात तीन खून; १६१ अकस्मात मृत्यूची नोंद, सहाजणांची ओळख पटली नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:32 IST2025-01-10T15:32:03+5:302025-01-10T15:32:17+5:30
सहाजणांची अद्याप ओळख पटली नाही : खुनाचे गुन्हे मात्र उघडकीस

परळी तालुक्यात वर्षभरात तीन खून; १६१ अकस्मात मृत्यूची नोंद, सहाजणांची ओळख पटली नाही
परळी : गत वर्षभरात परळी शहर व तालुक्यात तिघांचे खून झाले असून या प्रकरणी परळी शहर, संभाजीनगर व ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या तिन्ही घटना उघडकीस आलेल्या आहेत. मागील वर्षामध्ये विषारी द्रव्यप्राशन, आत्महत्या व अन्य कारणांमुळे परळी तालुक्यातील चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत एकूण १६१ अकस्मात मृत्यूंची नोंद झालेली आहे.
सिरसाळा पोलिस ठाणे हद्दीत २०२४ मध्ये एकही खून झालेला नाही. परळी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकाचा खून झालेला आहे. ही घटना उघडकीस आलेली आहे. संभाजीनगर व परळी ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत खुनाचा प्रत्येकी एक गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हादेखील उघडकीस आलेला आहे.
परळी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२४ मध्ये २४ अकस्मात मृत्यू झाले. विषारी द्रव पिऊन व आत्महत्या तसेच विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. परळी येथील संभाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अकस्मात मृत्यूच्या २५ घटना घडल्या आहेत. त्यामध्ये चारजणांची ओळख पटलेली नाही. परळी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६६ अकस्मात मृत्यू घडले आहेत. त्यांपैकी दोघांची ओळख पटलेली नाही. सिरसाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध कारणांनी ४६ अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद आहे. यामध्ये रस्ता अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला, अशी माहिती संबंधित पोलिस ठाण्याच्या सूत्रांकडून प्राप्त झाली.