केजजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 20:11 IST2020-12-22T20:10:57+5:302020-12-22T20:11:43+5:30
नांदूर फाटा ते सांगवी सारणी दरम्यान असलेल्या सारुळ पाटीवर अपघात

केजजवळ कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघे ठार
केज : केज-बीड रोडवरील नांदूर फाटा ते सांगवी सारणी दरम्यान असलेल्या सारुळ पाटीवर दुपारी ३ वाजेच्या दरम्यान एक कार व मोटारसायकलच्या भीषण अपघातात तिघे ठार झाले आहेत. यात एक माजी सैनिक आणि दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे.
दुपारी ३ वाजेच्या सुमारास नांदूर फाटा ते सांगवी सारणी रोडवर कल्याणहून रेणापूरकडे जाणारी कार (एमएच-०४/ जीएम२८९ ) आणि दुचाकीमध्ये (एमएच ४४ डी ६६९२) भीषण अपघात झाला. यात सारुळ येथील रहिवासी असलेले दुचाकीवरील आप्पाराव बापूराव ढाकणे ( ८० ) जागीच ठार झाले. तर माजी सैनिक सुंदर नामदेव ढाकणे ( ५३ ) आणि बहादूर राजाभाऊ पुरी ( ४८ ) यांचा उपचारासाठी अंबाजोगाई येथे नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.
हा अपघात एवढा गंभीर होता की, अपघातात दुचाकीचा चकनाचूर झाला आहे. कार सुद्धा अपघातस्थळापासून दोनशे मीटर अंतरावर जाऊन रस्त्याच्याकडेला खड्ड्यात उलटली आहे. कारमधील प्रवासी किरकोळ जखमी आहेत. अपघाताची माहिती मिळताच प्रभारी सहाय्यक निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, पोलीस कर्मचारी गुंजाळ, चालक हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळाची पाहणी केली.