बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 17:21 IST2025-09-11T17:20:21+5:302025-09-11T17:21:02+5:30

बीडमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरूच; वकील, डॉक्टरनंतर आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

Three government officials die in 20 days in Beed district; Extension officer ends life in Parli | बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

परळी: शहरातील शिवाजीनगर परिसरात बीड पंचायत समितीत कार्यरत असलेल्या एका विस्तार अधिकाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवार, दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, मागील २३ दिवसांत बीड जिल्ह्यात वकील, डॉक्टरनंतर आता विस्तार अधिकारी अशा तीन सरकारी अधिकाऱ्यांनी जीवन संपवल्याच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

मृत विस्तार अधिकाऱ्याचे नाव विलास डोंगरे असे असून ते परळी वैजनाथ येथील शिवाजीनगर भागात वास्तव्यास होते. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. डोंगरे यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ व तीन मुली असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांनी परळी पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील धर्मापुरी, सिरसाळा, कन्हेवाडी यांसह अनेक गावांमध्ये ग्रामविकास अधिकारी म्हणून उल्लेखनीय कार्य केले होते. घटनास्थळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे यांनी भेट दिली आहे.

जिल्ह्यात २३ दिवसांत तीन अधिकाऱ्यांनी संपविले जीवन
सरकारी वकील विनायक लिंबाजी चंदेल (वय ४७, रा. इंदेवाडी, जि. परभणी) यांनी २० ऑगस्ट रोजी वडवणी न्यायालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणात दोन दिवसानंतर एका न्यायाधीशावर आणि लिपीकावर गुन्हा दाखल आहे. तर त्यानंतर वडवणी येथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम यादव (वय २९) यांनी देठेवाडी गावाजवळील तलावात उडी मारून आत्महत्या केल्याचे ६ सप्टेंबर रोजी उघडकीस आले होते. आता आज परळी येथील विस्तार अधिकाऱ्याने जीवन संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यात मागील २३ दिवसांत या तिन्ही घटनांमध्ये सरकारी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी जीवन संपविल्याने बीडचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Web Title: Three government officials die in 20 days in Beed district; Extension officer ends life in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.