ज्यांनी सांभाळ केला, त्यांनीच सुपारी देऊन संपवलं! बीडच्या जवळगाव खून प्रकरणाचा उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 16:14 IST2025-12-22T16:11:10+5:302025-12-22T16:14:04+5:30
दारू पिऊन त्रास दिला, अंगावर धावला; मग रागात साडूच्या मुलाचा काटा काढला

ज्यांनी सांभाळ केला, त्यांनीच सुपारी देऊन संपवलं! बीडच्या जवळगाव खून प्रकरणाचा उलगडा
बीड : जवळगाव (ता. अंबाजोगाई) शिवारात आढळलेल्या अनोळखी प्रेताचे गूढ उकलण्यात बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या ४८ तासांत यश आले आहे. कौटुंबिक वादातून आणि मयताच्या त्रासाला कंटाळून त्याच्याच वडिलांच्या सख्ख्या साडूने भाडोत्री मारेकऱ्यांच्या मदतीने हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीसह चार जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
१८ डिसेंबर २०२५ रोजी बर्दापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जवळगाव शिवारात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह पालथ्या अवस्थेत आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात या व्यक्तीचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे समोर आले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवली. एलसीबीने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख स्वप्निल ऊर्फ चिंगू अशोक ओव्हाळ (३०, रा. रेणापूर, जि. लातूर) अशी पटवली. तपासादरम्यान पोलिसांना संशय आल्याने त्यांनी स्वप्निलचा नातेवाईक गोरोबा मधुकर डावरे याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता, खुनाचे धक्कादायक कारण समोर आले.
खुनाचे कारण: सततचा त्रास आणि दारूचे व्यसन
स्वप्निल हा मुख्य आरोपी गोरोबा डावरे याच्या साडूचा मुलगा होता. साडू आणि साळपिण्याचे निधन झाल्यामुळे गोरोबाच स्वप्निलचा पालक म्हणून सांभाळ करत होता. स्वप्निलचे लग्नही गोरोबानेच लावून दिले होते. मात्र, स्वप्निलला दारूचे व्यसन होते. तो दारू पिऊन पत्नीला आणि गोरोबाला सतत त्रास द्यायचा. एकदा तर त्याने गोरोबाच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला होता. याच रागातून गोरोबाने स्वप्निलचा काटा काढण्याचे ठरवले.
असा रचला कट
गोरोबाने लातूर आणि नांदेड येथील तीन साथीदारांच्या मदतीने स्वप्निलला रेणापूरहून जवळगाव येथे आणले. तिथे त्याला बेदम मारहाण करून गळा आवळून त्याची हत्या केली आणि मृतदेह शेतात फेकून दिला. या प्रकरणात पोलिसांनी गोरोबा मधुकर डावरे (वय ४५, रा. जवळगाव, ता. अंबाजोगाई), संतोष लिंबाजी मांदळे (वय ३४, रा. लातूर), किशोर गोरोबा सोनवणे (वय २९, रा. लातूर), अमोल विनायक चव्हाण (वय २६, रा. नांदेड) या आरोपींना अटक केली आहे.
या पथकाने केली कामगिरी
ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, पोलिस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि ज्ञानेश्वर कांबळे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णू सानप, गोविंद भताने पोलीस अंमलदार सचिन आंढळे, विकी सुरवसे, चालक अतुल हराळे यांनी केली.