अंजली दमानिया यांनी डॉक्टरांवर संशय व्यक्त केला, धसांनी थोरातांची बाजू घेतली; तपासाबाबत सगळंच सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 16:59 IST2025-01-27T16:54:40+5:302025-01-27T16:59:34+5:30
Walmik Karad : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉ. अशोक थोरात यांच्यावर आरोप केले आहेत.

अंजली दमानिया यांनी डॉक्टरांवर संशय व्यक्त केला, धसांनी थोरातांची बाजू घेतली; तपासाबाबत सगळंच सांगितलं
Walmik Karad ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉ. अशोक थोरात यांनी दिलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टवर संशय व्यक्त केला आहे. त्यांच्यावर गंभीर आरोपही केले आहेत. दरम्यान, आता या आरोपांची चौकशी होईल अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार सुरेश धस यांनी दिली आहे.
"थोडी तरी लाज बाळगा"; जितेंद्र आव्हाड महायुतीवर संतापले, वाल्मीक कराडबद्दल स्फोटक दावा
भाजपा आमदार सुरेश धस यांनी आज पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी आम्ही सर्व आरोपींना फाशी झाल्याशिवाय शांत बसणार नाही. बीड जिल्ह्यात कोणताही जातीयवाद नसून ही लढाई गुन्हेगारांविरोधात असल्याचेही धस म्हणाले.
'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!
आमदार सुरेश धस म्हणाले, एसआयटीने आता सुदर्शन घुलेला ताब्यात घेतले असेल. पोलीस आणि एसआयटी प्रमुख ज्या पद्धतीने काम करत आहेत त्यावर आता लोकांचा विश्वास बसत आहे. कृष्णा आंधळे आता सापडेल, या केसमध्ये आता १०० टक्के प्रोग्रेस आहे. आता उद्या किंवा परवा उज्ज्वल निकम यांची ऑर्डर निघेल, असंही धस म्हणाले.
डॉ. अशोक थोरात सीएस म्हणून चांगलं काम करतात-आमदार धस
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉ. अशोक थोरात यांच्यावर संशय व्यक्त केला होता. यावर बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, अशोक थोरात सध्या रजेवर आहेत. रजेवर असलेल्या व्यक्तीवर बोलणे उचित नाही. तो अधिकारी कर्तव्यावर असताना कधी कसूर न करणारा अधिकारी आहे. त्या डॉक्टरांची काम करण्याची पद्धत चांगली आहे. त्यांच्यावर जळणारे काही लोक असतील, त्यांनी प्रमुख लोकांना चुकीची माहिती देऊन गैरसमज पसरवला असेल. माझ मत अशोक थोरात सीएस म्हणून चांगलं काम करतात. अंजली ताई यांनी जे आरोप केले आहेत, त्याची चौकशी करतील, असंही आमदार सुरेश धस म्हणाले.
'पंडित पहिल्या टर्मचे आमदार मी त्यांच्यावर बोलणार नाही'
आमदार विजयसिंह पंडीत यांनी केलेल्या टीकेवर बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले, विजयसिंह पंडीत हे पहिल्या टर्मचे आमदार आहेत. ते फार लहान आहेत. पहिल्यावेळी मी त्यांच्यावर बोलणार नाही, ते जर भैय्यासाहेब बोलले असते तर मी उत्तर दिले असते, असंही धस म्हणाले.
ही कोणतीही जातीची लढाई नाही, कोणत्याच जातीत वाद नाही. ही गुंडगिरी, दहशत, दिवसा ढवळ्या मारली जाणारी माणस याविरोधात ही लढाई आहे. गुंडशाही आणि झुंडशाहीविरेधात सुरू आहे. या आकाला फासावर टाकल्यानंतर आम्ही शांत बसणार आहे, असंही सुरेश धस म्हणाले.
अंजली दमानिया यांचे आरोप काय?
समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी डॉ. अशोक थोरात यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. डॉ. अशोक थोरात यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट योग्य दिला आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. थोरात हे राजकीय रंग असणारे व्यक्ती आहेत, असा आरोपही दमानिया यांनी केला. अंजली दमानिया म्हणाल्या, डॉ. अशोक थोरात हे व्यक्ती राजकीय रंग असलेले व्यक्ती आहेत. ते मध्ये लोकसभा आणि विधानसभाही लढवणार होते. मला काल त्यांच्या एका मोठ्या हॉटेलबद्दल कळले. ते हॉटेल बघून मला धक्काच बसला. आता या व्यक्तीने जर संतोष देशमुख यांच्या पोस्टमार्टचे रिपोर्ट दिले असतील तर त्यांनी योग्य कारवाई केली की नाही? अशी शंका मनात येते, असंही अंजली दमानिया म्हणाल्या.