पोलिसांच्या अक्षम्य हयगयीमुळेच ही घटना घडली, त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे: धनंजय देशमुख
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 12:03 IST2025-03-05T12:02:14+5:302025-03-05T12:03:18+5:30
भावाला जसे तडफडून मारले, तसेच या सर्वांना फाशीचीच शिक्षा व्हावी; फोटो व्हायरलनंतर धनंजय देशमुख धायमोकलून रडले

पोलिसांच्या अक्षम्य हयगयीमुळेच ही घटना घडली, त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे: धनंजय देशमुख
बीड/केज : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे आणि अंगावर शहारे आणणारे काही कथित फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळीच मस्साजोगला जाऊन देशमुख कुटुंबाची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांना जरांगे पाटील पाहताच अश्रू अनावर झाले. जवळ येताच गळ्यात पडून ते धायमोकलून रडले. आई रोज पाहतेय... तिच्याकडे जायची हिंमत होत नाहीये.. असे म्हणत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली, तसेच आता आरोपींना फाशीच व्हायला हवी, तेव्हाच न्याय मिळेल, अशी अपेक्षाही धनंजय यांनी व्यक्त केली.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातधनंजय मुंडेंवर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात येऊन त्यांची आमदारकीसुद्धा रद्द करावी. या प्रकरणाचा पुरवणी तपास करण्यात यावा व यात धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे.
- मनोज जरांगे पाटील, मराठा आंदोलक
मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा
या घटनेतील सर्व मारेकऱ्यांसह त्यांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांना सहआरोपी करून त्यांना पण फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. या घटनेत पोलिस यंत्रणा, प्रशासन दोषी आहे. ज्यांनी कोणी तपासात अडथळे आणले, पळून जायला मदत केली, त्या सर्वांचा सहआरोपीत समावेश करावा. पोलिस यंत्रणेकडे हे फोटो अडीच महिन्यांपूर्वी आले आहेत. त्याचवेळी हे उघड झाले असते तर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला वेळ लागला नसता. त्यांना कोणी अभय दिले. हेही पाहिले पाहिजे.
- बजरंग सोनवणे, खासदार, बीड
पोलिसांनाही शिक्षा व्हावी
दोन वर्षांपासून यातील आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना पोलिसांच्या नाकावर टिच्चून हे आरोपी राजरोस पोलिसांसोबत फिरत होते. अवादा कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली त्याचवेळी या आरोपींच्या मुसक्या आवळल्या असत्या तर ही घटना घडतच नव्हती. पोलिसांनी आरोपीचे लोकेशन तत्काळ घेतले असते तरी आरोपी लवकर सापडले असते. माझ्या भावाचा जीव वाचला असता. पोलिसांच्या अक्षम्य हयगयीमुळेच ही घटना घडली असून, त्यांनाही याची शिक्षा झाली पाहिजे. भावाला जसे तडफडून मारले, तसेच या सर्वांना फाशीचीच शिक्षा व्हावी ही आपली इच्छा आहे.
- धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांचे भाऊ