युसूफवडगाव पोलीस स्टेशनपासून १५० मीटरवरील घर चोरट्यांनी फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 18:48 IST2021-02-11T18:37:47+5:302021-02-11T18:48:36+5:30
यासोबतच गावात अन्य एका ठिकाणीहून चोरट्यांनी सोयाबीनचे ९ कट्टे चोरले.

युसूफवडगाव पोलीस स्टेशनपासून १५० मीटरवरील घर चोरट्यांनी फोडले
केज : तालुक्यातील युसूफवडगांव पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शिक्षकाचे घर चोरट्यांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडले. चोरट्यांनी शिक्षकाच्या घरातून ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. यासोबतच गावात अन्य एका ठिकाणीहून चोरट्यांनी सोयाबीनचे ९ कट्टे चोरले. तर एका ठिकाणी घरमालक जागी झाल्याने चोरीचा प्रयत्न फसला. मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिक्षक अशोक दामोदर चौधरी यांचे घर युसुफ वडगाव पोलीस ठाण्यापासून १०० ते १५० मीटर अंतरावर आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास गेटचे कुलूप तोडून चोरटे घराच्या परिसरात आले. त्यानंतर किचनचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. एका खोलीतील कपाट तोडून त्यामधील रोख ३५ हजार रूपये लंपास केले. याबाबत रेखा अशोक चोधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर अन्य एका ठिकाणीहून चोरट्यांनी कुलूप तोडून सोयाबीनचे ९ कट्टे चोरून नेले. तसेच एका घरात प्रवेश करण्याच्या तयारीत असताना घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. गावात मागील काही दिवसांपासून चोरट्यांचा वावर वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.