दवाखान्यातून परतताना टँकरचा दुचाकीला धक्का; आजारी पत्नीचा चिरडून मृत्यू, पती जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 14:12 IST2024-09-05T14:09:59+5:302024-09-05T14:12:27+5:30
आष्टी तालुक्यातील कडा येथील घटना, टँकर चालक पोलिसांच्या ताब्यात

दवाखान्यातून परतताना टँकरचा दुचाकीला धक्का; आजारी पत्नीचा चिरडून मृत्यू, पती जखमी
- नितीन कांबळे
कडा ( बीड): दवाखान्यातून घरी परतत असताना दुचाकीला टँकरच्या पाठीमागील बाजूची धडक बसून टायरखाली आल्याने आजारी पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना कडा येथील केरूळ चौकात गुरूवारी सकाळी अकराच्या दरम्यान घडली. सुक्षला महादेव आंधळे ( ६५, रा.लिंबोडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील महादेव आंधळे हे आज सकाळी आजारी पत्नीस कडा येथील एका खाजगी दवाखान्यात घेऊन गेले होते. उपचार घेतल्यानंतर आंधळे पत्नीस दुचाकीवर ( एम.एच २३, बी.ई. ६०१०) घेऊन घरी परतत होते. दरम्यान, सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथील दुध संकलन क्रेंदातून एक टँकर ( एम.एच १६,सी.सी.९०९९) कडाकडे जात होते. केरूळ चौकात टँकरच्या पाठीमागील बाजूचा धक्का लागल्याने आंधळे यांचे दुचाकीवरुन नियंत्रण सुटले. यावेळी सुक्षला महादेव आंधळे यांचा टँकरच्या टायरखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. तर पती महादेव केराजी आंधळे हे गंभीर जखमी झाले. कडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन टॅकर चालकाला ताब्यात घेतले आहे. गंभीर जखमी आंधळे यांच्यावर उपचार सुरू आहेत.