पब्जी गेमचे अतिवेसन नडले; विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 18:34 IST2022-12-16T18:33:24+5:302022-12-16T18:34:31+5:30
आज पहाटेच शाळेच्या सहलीवरून मुलगा घरी आला होता

पब्जी गेमचे अतिवेसन नडले; विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपविले
- नितीन कांबळे
कडा (बीड) :बीडसांगवी येथील एका माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका १५ वर्षीय मुलाने आज सकाळी राहत्या घरी आत्महत्या केली. कृष्णा परमेश्वर साळवे असे मृत मुलाचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मुलाने पब्जी गेमच्या व्यसनामधून इतके टोकाचे पाऊल उचलले आहे.
कृष्णा परमेश्वर साळवे हा आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील एका माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे. वडील ऊसतोडणीला गेल्यामुळे कृष्णा आणि आई दोघेच घरी होते. तीन दिवसांपूर्वी तो शाळेच्या सहलीला गेला होता. आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास तो घरी परतला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्याची आई बाहेर गेल्याचे समजले. त्यानंतर सकाळी १० वाजेच्या सुमारास कृष्णाने दरवाज्याला आतून कडी लावून घेत कपड्याच्या चिंध्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, अंमलदार बब्रुवान वाणी यांनी पंचनामा केला. कृष्णाने पब्जी या गेमच्या व्यसनातून आत्महत्या केल्याची माहिती प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी दिली आहे.