बीडचा नवा 'आका', खोक्याच्या घरावर पोलिसांचा छापा; काय-काय सापडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 20:02 IST2025-03-08T20:00:54+5:302025-03-08T20:02:15+5:30

खोक्याचे नवनवे कारनामे समोर येऊ लागल्यानंतर सुरेश धस यांचीही राजकीय कोंडी झाल्याचं दिसत आहे.

The police raided satish bhosale Khokya house Hunting equipment and sharp weapons found in the raid | बीडचा नवा 'आका', खोक्याच्या घरावर पोलिसांचा छापा; काय-काय सापडलं?

बीडचा नवा 'आका', खोक्याच्या घरावर पोलिसांचा छापा; काय-काय सापडलं?

Beed Crime: गुन्हेगारी घटनांमुळे मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यात आणखी एका गुन्हेगाराचे धक्कादायक कृत्य समोर आले आहे. जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या याचे नवनवे प्रताप समोर येत आहेत. खोक्याकडून एका व्यक्तीला अर्धनग्न करून मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो वन्यप्राण्यांची शिकार करत असल्याचीही माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर आज वनविभागाने पोलिसांसह खोक्याच्या घरावर धाड टाकली. या धाडीत शिकारीच्या साहित्यासह धारदार शस्त्रेही आढळून आल्याचे समजते.

पोलिसांनी आज सतीश भोसले याच्या घरी टाकलेल्या धाडीत मोर आणि हरीण पकडण्यासाठी लागणारी जाळी, वाघोर, धारदार शस्त्र आणि वन्य प्राण्यांचे मांसही जप्त केल्याची माहिती आहे. सतीश भोसले याने यापूर्वी अनेकदा प्राण्यांची शिकार केल्याचं बोललं जात आहे. परंतु त्याचे आता विविध व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागालाही जाग आली असून त्याच्याभोवती कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात झाली आहे.

खोक्यामुळे सुरेश धसही अडचणीत

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून भाजपचे आष्टी-पाटोदा-शिरूर मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी मोठ्या प्रमाणात रान उठवलं होतं. देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींच्या पाठीशी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांची राजकीय शक्ती उभी असल्याचा आरोप आमदार धस यांनी केला होता. परंतु बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात दहशत निर्माण करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या हा सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचं उघड झालं आहे. खोक्याचा एकएक कारनामा समोर येऊ लागल्यानंतर सुरेश धस यांचीही राजकीय कोंडी झाल्याचं दिसत आहे.
 
सतीश भोसले कुख्यात गुन्हेगार
सतीश भोसले हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात बीड व अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण ६ प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. यामध्ये विवाहितेचा छळ करणे, अपहरण करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे आदींचा समावेश आहे.

Web Title: The police raided satish bhosale Khokya house Hunting equipment and sharp weapons found in the raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.