ज्या मजूराने रुग्णालयात दाखल केले मुकादमाने बाहेर येऊन त्यालाच दगडाने ठेचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 17:21 IST2024-12-24T17:20:54+5:302024-12-24T17:21:56+5:30

परळी तालुक्यातील ऊसतोड कामगाराचा कर्नाटकातील बेळगावात खून, मुकादम अटकेत

The laborer who admitted contractor to the hospital came out and killed labor | ज्या मजूराने रुग्णालयात दाखल केले मुकादमाने बाहेर येऊन त्यालाच दगडाने ठेचले

ज्या मजूराने रुग्णालयात दाखल केले मुकादमाने बाहेर येऊन त्यालाच दगडाने ठेचले

परळी : ऊस तोडणीच्या कामासाठी गेलेल्या परळी तालुक्यातील अस्वलआंबा येथील एका कामगाराचा मुकादमानेच दगडाने ठेचून खून केल्याची घटना 22 डिसेंबर रोजी रात्री बेळगाव जिल्यातील घटप्रभा येथील एका दवाखान्यासमोर घडली आहे. याप्रकरणी ऊसतोड कामगाराच्या टोळीचा मुकादम श्रीकृष्ण ढाकणे ( रा. अस्वलआंबा तालुका परळी)  याच्या विरोधात कर्नाटकातील घटप्रभा पोलिस स्टेशनमध्ये 23 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुकादमास  पोलीसांनी अटक केली आहे.

नातेवाईकांनी सांगितलेल्या माहितीनुसार, विकास बालासाहेब जोगदंड (वय २८, रा. अस्वल अंबा, ता. परळी, जि. बीड) हा दोन महिन्यांपूर्वी कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात उसतोडीसाठी मुकादम  श्रीकृष्ण विठ्ठल ढाकणे (वय ४७, रा. अस्वलंबा, ता. परळी, जि. बीड) याच्या टोळीत गेला होता. 22 डिसेंबर रोजी मुकादम ढाकणे हा आजारी असल्याने त्यास विकासने उपचारासाठी बेळगावजवळ घटप्रभा येथे घटप्रभा- हुक्केरी दरम्यान असणाऱ्या एका दवाखान्यात आणले. रात्री ढाकणे यास रुग्णालयात दाखल करून विकास रुग्णालयाच्या बाहेर असलेल्या निवारा गृहात झोपला. काही वेळाने ढाकणे अचानक रुग्णालयाच्या बाहेर आला. काही कळायच्या आत त्याने विकासच्या डोक्यात भलामोठा दगड घातला. हे पाहून रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकाने ताबडतोब ढाकणे याला पकडले. तोपर्यंत विकासचा मृत्यू झाला होता. ढाकणेला सुरक्षा रक्षकाने घटप्रभा पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी पोलिस निरीक्षक एच. डी. मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. आर. कणवी अधिक तपास करीत आहेत. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अस्वलआंबा या गावी  24 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता मृत विकासच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विकास जोगदंडच्या वडील, चुलते, भाऊ व इतर नातेवाईकांना ही घटना कळताच त्यांनी घटप्रभा येथे जावून 23 डिसेंबर रोजी मृतदेह ताब्यात घेतला. 24 डिसेंबर रोजी सकाळी आपल्या अस्वलआंबा या गावी पोहोचले. आठ वाजता विकास जोगदंड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. विकास जोगदंड यांच्या पश्चात एक मुलगी, पत्नी, आई-वडील भाऊ असा परिवार आहे.

Web Title: The laborer who admitted contractor to the hospital came out and killed labor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.