भरधाव जीप उलटून हॉटेलात शिरली; नागरिकांनी काचा फोडून जखमींना बाहेर काढले,एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 18:50 IST2023-04-13T18:49:54+5:302023-04-13T18:50:25+5:30
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव जीप उलटली

भरधाव जीप उलटून हॉटेलात शिरली; नागरिकांनी काचा फोडून जखमींना बाहेर काढले,एकाचा मृत्यू
- मधुकर सिरसट
केज (बीड) : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे विठाई पुरमजवळ भरधाव जीप उलटून रस्त्याच्या कडेवर असलेल्या हॉटेलात शिरली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान झाला. जखमींना अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील परतूर पंचायत समितीचे माजी सभापती रामेश्वर भास्कर तनपुरे, नागेश उद्धवराव तनपुरे आणि निवृत्ती आप्पासाहेब तनपुरे ( रा. वाढोना, तालुका परतुर ) हे तिघे बुधवारी रात्री जीपने ( क्र. एम एच-17/ ए जे-5382) तुळजापूर येथून परतूरकडे परतत होते. केजजवळच्या विठाई पुरम परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने जीप उलटली. भरधाव जीप रस्त्याच्या बाजूच्या पठाण यांच्या चहाच्या हॉटेलात शिरली.
या भीषण अपघातात परतूर पंचायत समितीचे माजी सभापती रामेश्वर भास्कर तनपुरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर नागेश उद्धवराव तनपुरे आणि निवृत्ती आप्पासाहेब तनपुरे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातातील मयत आणि जखमी हे माजी मंत्री बबनराव लोणीकंरांचे नातेवाईक असल्याचे समजते.
काचा फोडून तिघांनाही बाहेर काढले
अपघाताचा मोठा आवाज ऐकून घटस्थळापासून जवळच असलेले कृष्णा लोहिया, भोसले,राजाभाऊ सूर्यवंशी व विठाई पुरम येथील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेला व पोलिसांना माहिती देऊन नागरिकांनी गाडीच्या काचा फोडून तिघांना बाहेर काढले. रुग्णवाहिका चालक मकरंद घुले आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. शेख आणि डॉ. मुंडे यांनी घटनास्थळी येऊन तिघांनाही उप जिल्हा रुग्णालयात हलविले. एकास तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर प्रथमोपचारानंतर दोघांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे रवाना केले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.