कुटुंब शेतीच्या कामात व्यस्त होते, इकडे चोरट्यांनी भरदिवसा घरफोडले, दागिन्यांसह रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2022 19:58 IST2022-09-17T19:58:24+5:302022-09-17T19:58:47+5:30
भरदिवसा घरफोडी करून ३ तोळे दागिन्यांसह तीस हजारांची रोकड लंपास

कुटुंब शेतीच्या कामात व्यस्त होते, इकडे चोरट्यांनी भरदिवसा घरफोडले, दागिन्यांसह रोकड लंपास
कडा (बीड): संपूर्ण कुटुंब शेतात गेल्याची संधी साधून चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी कपाटातील ३ तोळे सोन्यासह तीस हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती आहे.
आष्टी तालुक्यातील कडा देवळाली रोडवरील घाटा पिंपरी येथील जगताप वस्तीवरील दत्तु जगताप कुटुंबासह राहतात. सध्या शेतीची कामे सुरु असल्याने जगताप कुटुंब शेतात गेले होते. दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान जगताप पत्नी, मुले-सुनासह उडीद गोळा करण्यात व्यस्त होते तर दुसरीकडे चोर त्यांच्या घरात शिरले होते.
दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील ३ तोळे सोन्यासह तीस हजार रूपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. माहिती मिळताच घटनास्थळी अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवि देशमाने, अंमलदार शिवदास केदार, अमोल शिरसाठ यांनी भेट देऊन पाहणी केली. भरदिवसा रहदारीच्या रोडवर घरफोडी झाल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.