आत्याच्या मुलीचा कारनामा, मित्राच्या मदतीने मामाच्या मुलीचा विहिरीत ढकलून केला खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 19:22 IST2022-11-26T19:20:18+5:302022-11-26T19:22:39+5:30
तब्बल चार तासांनी मुलीचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

आत्याच्या मुलीचा कारनामा, मित्राच्या मदतीने मामाच्या मुलीचा विहिरीत ढकलून केला खून
दिंद्रुड ( बीड) : एका १८ वर्षीय तरुणीने मित्राच्या मदतीने मामाच्या मुलीचा विहिरीत ढकलून खून केल्याची खळबळजनक घटना कासारी येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिंद्रुड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. विशेष म्हणजे, आरोपीमधील तरुणी मृत मुलीची आते बहिण लागते. दोन्ही आरोपी फरार असून दिंद्रुड पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
सविस्तर वृत्त असे की, कासारी येथील साक्षी ज्ञानोबा कदम (१६) तिच्या आत्याची मुलगी वैष्णवी मनोहर काळे (१८) सोबत शुक्रवारी सकाळी १० वाजता कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दुपारी १ वाजेदरम्यान कदम यांच्या शेतात चुलता रमेश कदम व आजी जनाबाई हे काम करत असताना विहिरीच्या दिशेने त्यांना साक्षीच्या ओरडण्याचा आवाज आला. भाची वैष्णवी व तिच्यासोबत असलेला आकाश उर्फ लखन हे दोघे साक्षीला विहिरीत ढकलत असल्याचे त्यांना दिसले. रमेश कदम विहिरीपर्यंत जाईपर्यंत त्यांनी साक्षीला विहिरीत ढकलून तेथून पळ काढला. त्यानंतर कदम यांनी साक्षीचा विहिरीत शोध घेण्यात आला. तब्बल चार तासांनी तिचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला.
दरम्यान, आज सकाळी धारूर ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. परंतु, आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. दिंद्रुड पोलिसांसोबत बोलणे झाल्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी रमेश कदम यांच्या तक्रारीवरून दिंद्रुड पोलीस ठाण्यात वैष्णवी मनोहर काळे आणि आकाश उर्फ लखन नागोराव तांबडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.