मामाने रुग्णालयात बोलवल्याची थाप; हॉस्टेलसमोरून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 17:11 IST2024-09-27T17:10:19+5:302024-09-27T17:11:46+5:30
निर्जनस्थळी अत्याचार केल्यानंतर पीडितेला मुळगावी नेऊन सोडले

मामाने रुग्णालयात बोलवल्याची थाप; हॉस्टेलसमोरून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
केज ( बीड) : 'तू आजारी असल्यामुळे उपचारासाठी तुझ्या मामाने तुला रूग्णालयात बोलावले आहे', अशी थाप मारुन दोघांनी शहरात शिक्षणानिमित्त राहणाऱ्या एक अल्पवयीन मुलीचे तिच्या हॉस्टेलसमोरून अपहरण केले. त्यानंतर अंबाजोगाई महामार्गावर असलेल्या एका लाॅजच्या मागील जागेत नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी दोघांविरुद्ध केज पोलिसांत गुरुवारी रात्री गुन्हा नोंद झाला आहे.
बीड तालुक्यातील एका गावच्या अल्पवयीन मुलीस शिक्षणानिमित्त मामाने केज शहरातील हॉस्टेलवर ठेवले. बुधवारी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल अंकुश जाधव ( दोघेही राहणार दहीफळ चिंचोली) हे दोघे मुलीच्या हॉस्टेलवर आले. 'तू आजारी असल्यामुळे तुझ्या मामाने तुला शहरातील उपजिल्हा रूग्णालयात बोलावले आहे', अशी थाप मारुन दोघांनी तिला दुचाकीवर बसवून अंबाजोगाई महामार्गावर नेले. येथे एका लाॅजच्या मागील खुल्या जागेत सनी उर्फ स्वप्नील पाडळे याने मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला मुळगावी सोडले. अत्याचारामुळे घाबरलेल्या पिडीतीने आईवडिलांना आपबीती सांगितली. नातेवाइकांनी लागलीच केज पोलिस स्टेशन गाठले.
या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून केज पोलिस स्थानकात बाल लैंगीक प्रतिबंधक, पोक्सो कायद्यानुसार सनी उर्फ स्वप्नील पाडळे आणि अमोल अंकुश जाधव या दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.