गेवराई : तालूक्यातील गुळज भगवाननगर येथे आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी आलेली दोन मुले कालव्यात बुडाल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली. शेख अरबाज ( १३, रा. पैठण )आणि शेख नशिर ( १२, रामपुरी ता. गेवराई ) अशी दोन्ही मुलांची नावे आहेत. यातील एकाचा मृतदेह बुधवारी दुपारी सापडला असून दुसऱ्याचा शोध सुरु आहे.
शेख अरबाज आणि शेख नशिर हे दोघे बुधवारी पालकांसोबत भगवान नगर येथे नातेवाईकाच्या विवाहासाठी आले होते. दरम्यान, दोघेही जवळच असलेल्या पैठण उजव्या कालव्यात पोहण्यासाठी गेले. सध्या कालव्यात मोठ्याप्रमाणात पाणी आहे. दोघेही कालव्यात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने आणि पोहता येत नसल्याने दोघेही कालव्यात वाहून गेले. याची माहिती नागरिक आणि नातेवाईकांना मिळताच त्यांचा शोध घेण्यात आला. यावेळी शेख आरबाज याचा मृतदेह रात्री १० वाजेच्या सुमारास कालव्यात सापडला. तर दुसऱ्याचा शोध सुरु आहे. मुलांची नातेवाईक आणि बीड येथील शोध पथक त्याचा शोध घेत आहेत.