सांगा, महादेव मुंडेला कोणी मारले? विशेष पथकाकडून ३ संशयितांची चौकशी, काहींनी परळी सोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:59 IST2025-02-25T12:58:03+5:302025-02-25T12:59:13+5:30
विशेष पथकामुळे १६ महिन्यांनंतर तपासाला गती

सांगा, महादेव मुंडेला कोणी मारले? विशेष पथकाकडून ३ संशयितांची चौकशी, काहींनी परळी सोडले
बीड : परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाच्या तपासाला विशेष पथकामुळे १६ महिन्यांनंतर गती आली आहे. संशयित असलेल्या तिघांना पोलिस अधीक्षक कार्यालयात आणून दोन दिवस चौकशी करण्यात आली. महादेव मुंडेला कोणी मारले? काय कारण होते? असे अनेक प्रश्न त्यांना विचारण्यात आले आहेत. परंतू संशयितांनी आम्ही केलेच नाही, असा स्टँड घेतला.
परळी शहरातील पिग्मी एजंट महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर २०२३ रोजी धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता. २३ ऑक्टोबर २०२३ रोजी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात परळी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. परंतु त्याचे आरोपी शोधले नव्हते. हे प्रकरण शांतही झाले होते. परंतु मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने महादेव मुंडे यांचे खून प्रकरणही समोर आले. भाजपचे आ. सुरेश धस यांच्यासह इतरांनी हे प्रकरण लावून धरले. त्यानंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी या प्रकरणाचा तपास परळी शहर पोलिसांकडून काढून घेत अंबाजोगाईचे उपअधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे दिला. परंतु त्यांनीही तपासात काहीच न केल्याचा आरोप महादेव यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला होता. तसेच उपाेषणाचा इशाराही दिला. त्यावर पुन्हा काँवत यांनी पोलिस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह पाच जणांचे विशेष पथक मदतीला दिले. या पथकाने परळीतील तीन संशयिताना दोन दिवस पोलिस अधीक्षक कार्यालयात आणून चौकशी केली. तसेच इतरही लोकांचा शोध सुरू आहे. आठवडाभरात आणखी लोकांना चौकशीसाठी आणले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
सुळेनंतर धसांनी घेतली भेट
शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्यानंतर भाजपा आ. सुरेश धस यांनीही त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
८ साक्षीदारही तपासले
संशयितांची तर चौकशी केलीच, शिवाय आठ साक्षीदारही या प्रकरणात तपासण्यात आले. यात काही महिलांचाही समावेश आहे.
काहींनी परळी शहर सोडले
मुंडे खून प्रकरणात ज्या लोकांवर संशय होता, असे अनेकजण परळी शहर सोडून पसार झाल्याचीही माहिती आहे. विशेष पथकाने नातेवाइकांमार्फत त्यांना निरोप देऊन चौकशीला हजर राहण्याचे सांगितले आहे. जर स्वत:हून हजर झाले नाहीत, तर त्यांना पोलिस खाक्या दाखवून आणण्याचा इशाराही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.
गुन्हा उघड करण्यासाठी पूर्ण प्रयत्न
आतापर्यंत १० ते १५ लोकांची चौकशी केली आहे. आमचे पथक हा गुन्हा उघड करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत. यात यश येईल, अशी अपेक्षा आहे. जर कोणाला काही माहिती द्यायची असेल तर थेट मला काॅल करावा, नाव गोपनीय ठेवले जाईल.
- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड.