विनामास्क फिरणाऱ्यांना तहसीलच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:33 IST2021-03-10T04:33:36+5:302021-03-10T04:33:36+5:30
माजलगाव : येथील तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना दंड करण्याऐवजी मारण्यास सुरुवात केल्याने संतप्त नागरिकांनी तहसीलदारांच्या ...

विनामास्क फिरणाऱ्यांना तहसीलच्या कर्मचाऱ्यांकडून मारहाण
माजलगाव : येथील तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना दंड करण्याऐवजी मारण्यास सुरुवात केल्याने संतप्त नागरिकांनी तहसीलदारांच्या वाहनालाच घेराव घातला. त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून मारहाण थांबवण्यात आली.
माजलगाव शहरात केवळ नगरपालिकेचे कर्मचारीच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाया करताना दिसत आहेत. या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येत असल्यामुळे मागील २-३ दिवसांत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही कारवाया थांबवल्या. या कारवाया थांबवल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत विचारणा केली असता न.प.च्या कर्मचाऱ्यांना आम्हाला पोलीस व तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्याचे सांगितले होते. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांची चांगलीच खरडपट्टी केली असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
तहसीलदारांची वरिष्ठांकडून खरडपट्टी झाल्याने मंगळवारी सकाळपासून आंबेडकर चौकात तहसील कार्यालयातील कर्मचारी व नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाया करण्यास सुरुवात झाली. तहसीलचे कर्मचारी हातात काठ्या घेऊन ज्याच्या तोंडाला मास्क नाही त्याला काठी मारायचे. आपल्याला माराच्या भीतीने दुचाकीचालक कोणीकडेही वाहने वळविताना दिसत होते. यामुळे मोठा अपघात होता होता राहिला. यानंतर कॉ. शिवाजी कुरे, शेषराव आबुज, चंद्रकांत गाते, एकनाथ सक्राते, शेख समदू आदींच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना जाब विचारताच ते कर्मचारी धूम ठोकत तहसीलदारांच्या वाहनात जाऊन बसले. त्यामुळे नागरिकांनी तहसीलदारांच्या वाहनाला घेराव घालत मारण्याचा जाब तहसीलदार यांना विचारला. त्यानंतर तहसीलदारांनी यापुढे कोणीही मारहाण करू नये, असे सांगितल्यानंतर जमलेले नागरिक निघून गेले.
===Photopath===
090321\img_20210309_110948_14.jpg~090321\img_20210309_111137_14.jpg
===Caption===
माजलगावात विनामास्क फिरणाऱ्यांना तहसील कर्मचाऱ्यांनी काठीने मारहाण करणे सुरू केल्यानंतर नागरिकांनी तहसीलदारांच्या वाहनाला घेराव घातला.~