शिक्षकांवर इतर कामांचेच ओझे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:28 IST2021-02-05T08:28:51+5:302021-02-05T08:28:51+5:30
बीड : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांवर अतिरिक्त कामाच्या बोजामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, शिक्षकांना केवळ शैक्षणिक व अध्यापनाचे ...

शिक्षकांवर इतर कामांचेच ओझे
बीड : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांवर अतिरिक्त कामाच्या बोजामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून, शिक्षकांना केवळ शैक्षणिक व अध्यापनाचे काम दिल्यास गुणवत्तेमध्ये सुधारणा होऊ शकेल. शिक्षकांना अशैक्षिणक कामे देऊ नयेत, अशी मागणी वारंवार होत असली तरी राष्ट्रीय कर्तव्य म्हणून ही कामे करणे क्रमप्राप्त ठरत असल्याने व शासनाचेच निर्देश असल्याने शिक्षकांना निमुटपणे ही कामे करावी लागत आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामपातळीवरील कोणत्याही योजना असोत, अथवा राष्ट्रीय कार्यक्रम शिक्षकांवर जबाबदारी टाकली जाते. मतदारांची नोंदणी किंवा निवडणूक ब्लॉक लेवल ऑफिसरचे काम असो नेहमी इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकही ते सांभाळतात. जनगणनेचे काम असेल किंवा राष्ट्रीय कार्यक्रमात संबंधित विभागाला पूरक म्हणून शिक्षकांवर जबाबदारी दिली जाते. शासन निर्देशामुळे शिक्षकांना मूळ काम कमी आणि इतर कामे जास्त करण्याची वेळ येत आहे.
कोरोना लॉकडाऊनमध्ये जिल्हा सीमेपासून गाव सीमेपर्यंत शिक्षकांना कर्तव्य बजावावे लागले. त्याचबरोबर रुग्णांच्या आणि शहरात येणाऱ्या व्यक्तींच्या नोंदणीपासून त्यांच्या एकूण आजाराबद्दलची माहिती घेण्यासाठी संवाद साधणे, ती माहिती शासनाकडे परिपूर्ण करून देणे, लॉकडाऊन काळात शिक्षकांना नेमून दिलेल्या भागातील संबंधित किराणा दुकानातून नागरिकांच्या घरापर्यंत साहित्य पोहोचविण्याची जबाबदारीदेखील देण्यात आली होती, हे विशेष. शाळा सुरू असो वा नसो अशा विविध कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असतानाच विविध शिक्षक संघटना विरोध दर्शवितात. मात्र, अनेक कामे राष्ट्रीय उपक्रमातील असल्यामुळे विरोधाचा सूर मंदावतो.
शिक्षकांना केवळ शैक्षणिक कामकाजाची जबाबदारी दिली तर ते अतिरिक्त बोज्यातून मुक्त होऊ शकतील. मात्र, शासनाची योजना राबविताना गुणवत्तेकडे दुर्लक्ष करीत शिक्षकांना कामाला लावले जाते. अशा कामांसाठी अस्थायी स्वरूपात अतिरिक्त बळ उभे केल्यास शिक्षकांवरील ताण कमी होईल व शासनाच्या योजनेची अंमलबजावणी होऊ शकेल, असा सूर शिक्षक संघटनांमधून उमटला.
-------
शिक्षकांना जवळपास ४० ते ४५ शैक्षणिक कामे वेगवेगळ्या वेळेला करावी लागतात. शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नयेत असे शासनाचे, तसेच न्यायालयाचे आदेश आहेत. जवळजवळ ८० टक्के शाळा या द्विशिक्षकी आहेत. या सर्व कामांचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर व शाळेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
-राजेंद्र खेडकर, राज्य संपर्कप्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.
------
बीड जिल्ह्यात एकशिक्षकी शाळा आता नाहीत, तर १४९७ द्विशिक्षकी शाळा आहेत. शासकीय योजना अथवा राष्ट्रीय कार्यक्रमांच्या अंमलबजावणीदरम्यानची कामे करण्यासाठी एक शिक्षक पूर्णवेळ गुंतून पडतो. त्यामुळे दुसऱ्या शिक्षकावरही कामाचा ताण येतो. शासनाच्या शालेय पोषण आहारांतर्गत धान्याचे विद्यार्थ्यांना वाटप, तसेच त्याची माहिती संकलित करणे, कृषी, आरोग्य विभागाच्या विविध योजनेत पूरक कामे शिक्षकांना करावी लागतात. मतदार नोंदणी, विविध योजनांचे सर्वेक्षण, नोंदणी व इतर माहिती संकलनासोबतच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे, पोषण आहाराचे वाटप करणे, शाळा पातळीवर व्यवस्थापनाचे काम करावे लागते.
----------
किती शिक्षक अशैक्षणिक कामकाजात सहभागी होतात, असा प्रश्न करीत सामाजिक भावनेतून प्रसंगी आरोग्याबाबत जोखीम स्वीकारून अनेक शिक्षक काम करतात; परंतु अनेक शिक्षक पुढारीपणातून जबाबदाऱ्या टाळून अतिरिक्त कामांचा बोजा म्हणत ओरड करतात. राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षकांनी अध्यापनाची जबाबदारी सांभाळून ही कामे करायला हवीत, असे मत अनेक शिक्षकांनी मांडले.
---------
जिल्ह्यातील जि.प. शाळा - २४९१
शिक्षक -९४६९
विद्यार्थी - १,७५,५३३
------