शाळा पाहणी दरम्यान मोबाइलवर बोलणारी सहशिक्षिका निलंबित
By शिरीष शिंदे | Updated: January 6, 2024 16:58 IST2024-01-06T16:58:37+5:302024-01-06T16:58:47+5:30
बीड जिल्हा परिषद सीईओंनी केली कारवाई

शाळा पाहणी दरम्यान मोबाइलवर बोलणारी सहशिक्षिका निलंबित
बीड : शाळेस भेट देण्यासाठी जिल्हा न्यायाधीश आले असता, एक सहशिक्षिका मोबाइलवर बोलत असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी बीड शहरातील गांधीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सहशिक्षिका एस. आर. आंधळकर यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी शुक्रवारी निलंबित केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशावरून शाळांना भेटी देणे सुरू होते. दरम्यान, ११ सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायाधीश -१ एस. आर. पाटील यांनी बीड शहरातील गांधीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस भेट दिली. या भेटीदरम्यान सहशिक्षिका एस. आर. आंधळकर या मोबाइलवर संभाषण करीत असल्याचे निदर्शनास आले. सदरील प्रकारावरून आपणास निलंबित करून विभागीय चौकशी का करण्यात येऊ नये? अशी कारणे दाखवा नोटीस सहशिक्षिका आंधळकर यांना जि. प. शिक्षण विभागाने बजावली होती.
नोटीस खुलाशामध्ये मोबाइलवर संभाषण करीत असल्याचे सहशिक्षिका आंधळकर यांनी मान्य केले. जि. प. सेवा शिस्त व अपील नियमामधील तरतुदीनुसार सहशिक्षिका एस. आर. आंधळकर यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक यांनी शुक्रवारी निलंबित केले.