Teacher killed in motorcycle accident in Telgaon | तेलगाव येथे मोटारसायकल अपघातामध्ये शिक्षक ठार
तेलगाव येथे मोटारसायकल अपघातामध्ये शिक्षक ठार

लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : माजलगावहून तेलगावकडे दुचाकीवर येणाऱ्या शिक्षकाची मोटारसायकल एका म्हशीला धडडून रस्ता दुभाजकावर आदळली. या अपघातातशिक्षक ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी तेलगाव येथे माजलगाव रोड परिसरात घडली.
तेलगावपासून जवळच असलेल्या कासारी बो. (ता.धारूर) येथे जि. प. प्राथमिक शाळेत सहशिक्षक असलेले बाबाराय रामराव पडलवार हे सोमवारी काही कामानिमित्त माजलगावला गेले होते. तेथील काम आटोपल्यानंतर ते दुचाकी (एमएच ४४-२५७९) वरून तेलगावच्या दिशेने येत होते. तेलगाव येथे माजलगाव रोडवर जेथे रस्ता दुभाजक सुरु होतात तेथे त्यांच्या दुचाकीला म्हैस आडवी आली. पडलवार यांचा दुचाकीवरील ताबा निसटला व दुचाकी म्हशीला धडकून, लगतच असलेल्या रस्ता दुभाजकला धडकली.
अपघात गावालगत घडल्याने तेथील त्यांचे सहकारी बिल्पे, मरेवार, नाईकनवरे व इतर नागरिकांनी पडलवार यांना येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारार्थ नेले. परंतु उपचार सुरु करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पडलवार यांचे मूळ गाव हे (एकवरा ता.मुखेड जि.नांदेड) हे असून, ते परळी येथे वास्तव्यास होते.

Web Title: Teacher killed in motorcycle accident in Telgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.