वसुंधरेच्या रक्षणासाठी भिंती झाल्या बोलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:31 IST2021-03-21T04:31:56+5:302021-03-21T04:31:56+5:30
शिरूरमध्ये साकारली चित्रसृष्टी : नगर पंचायतकडून प्रबोधन माझी वसुंधरा अभियान : शिरूरमध्ये साकारली चित्रसृष्टी शिरूर कासार नगरपंचायतने ‘माझी वसुंधरा’ ...

वसुंधरेच्या रक्षणासाठी भिंती झाल्या बोलक्या
शिरूरमध्ये साकारली चित्रसृष्टी : नगर पंचायतकडून प्रबोधन
माझी वसुंधरा अभियान : शिरूरमध्ये साकारली चित्रसृष्टी
शिरूर कासार नगरपंचायतने ‘माझी वसुंधरा’ या अभियानात सहभागी होऊन त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी त्या जागेला साजेशी अशी बोलकी चित्रसृष्टी साकारून निसर्गाच्या या पंचतत्वासोबत जीवन पद्धती अंगीकारल्याशिवाय आपण निसर्गासोबत जगू शकणार नाही आणि जैवविविधतेचे अस्तित्वदेखील राहणार नाही, असा संदेश दिला जात आहे. हे अभियान २ ऑक्टोबर ते ३१ मार्चपर्यंत राबविण्यात येत आहे, यासाठी गुणांकनदेखील होणार आहे आणि ते त्रयस्त यंत्रणेमार्फत केले जाणार आहे. शिरूर नगरपंचायतने या अभियानात सहभाग घेतल्यानंतर अभियानात अंतर्भाव असलेल्या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. नदीचे होणारे प्रदूषण टाळून पात्र स्वच्छ ठेवा, पाणी स्वच्छ व निर्मळ असावे, उघड्यावर कचरा टाकू नका, आपला परिसर स्वच्छ, सुंदर व हरित करा, घराबरोबर परिसर स्वच्छ ठेवा, कचरा वर्गीककृत करा, आरोग्याचे सरंक्षण करा, वृक्षलागवड व संरक्षण करा, उघड्यावर न जाता शौचालयाचा वापर करा, असा संदेश हे चित्र देत आहेत. आपण फेकलेला कचरा कर्मचारी उचलतात त्यांचेही आरोग्य बाधित होऊ नये याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आले. युवक युवतींसाठी ‘सेल्फी पाॅइंट’ची निर्मिती करण्यात आली आहे. फुलपाखरांसारखे जीवन जगण्याची ऊर्जा ही चित्रे देत आहेत.
माणुसकीची भिंत
चित्रसृष्टीत घनकचरा व्यवस्थापन नगरपंचायत व सोशल लॅबच्या माध्यमातून चित्रे साकारली आहेत. याशिवाय माणुसकीची भिंतदेखील उभारण्यात आली आहे. तुम्हाला नको असलेले या भिंतीवर टाका, ज्यांना हवं असेल त्यांनी घेऊन जावे यासाठी ही भिंत दात्याला आणि मागत्याला खुणावते आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
‘माझी वसुंधरा’ या अभियानात आपल्या नगरपंचायतीने सहभाग घेतला आहे, यात मूल्यांकन होणार असून चांगले गुणांकन मिळविण्यासाठी हा उपक्रम राबवीत आहोत, सर्व नागरिकांनी सहकार्य ठेवावे व आपले शहर बक्षीसपात्र होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रभारी मुख्याधिकारी किशोर सानप यांनी केले आहे.
===Photopath===
200321\20bed_7_20032021_14.jpg