मुंडेंकडून ३०० कोटींचा घोटाळा, सुरेश धस यांचा दावा; थोड्या दिवसांपुरता तरी राजीनामा देण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 05:12 IST2025-02-21T05:12:34+5:302025-02-21T05:12:59+5:30
धस यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन मुंडे कृषी मंत्री असतानाचे अनेक घोटाळ्यांचा गौप्यस्फोट केला. आता या सर्व घोटाळ्यांची एसीबी, ईडी, सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणीही केली.

मुंडेंकडून ३०० कोटींचा घोटाळा, सुरेश धस यांचा दावा; थोड्या दिवसांपुरता तरी राजीनामा देण्याची मागणी
बीड/आष्टी : भाजपचे आष्टीचे आ. सुरेश धस यांनी पुन्हा एकदा गौप्यस्फाेट करून मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खाते असताना ३०० कोटी रूपयांचा घाेटाळा केल्याचा आरोप केला. मुंडे यांनी थोड्या दिवसापुरता का होईना राजीनामा द्यावा, संतोष देशमुख प्रकरणात सहभाग आढळला नाही तर पुन्हा मंत्री व्हावे, असे म्हणत आ. धस यांनी पहिल्यांदाच मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
धस यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन मुंडे कृषी मंत्री असतानाचे अनेक घोटाळ्यांचा गौप्यस्फोट केला. आता या सर्व घोटाळ्यांची एसीबी, ईडी, सीबीआय मार्फत चौकशी करावी, अशी मागणीही केली. तसेच मी खोटं बोलत असेल तर माझ्यावर मानहानीचा दावा टाकावा किंवा मुंडे यांनी या सर्वांचा खुलासा करावा, असे आव्हानही त्यांनी दिले.
भारतीय किसान संघाने एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिले होते. त्यांनी त्यावर स्वाक्षरी केली. परंतू वाल्मीक कराड याने हे पत्र कृषी अधिकाऱ्यांच्या समोर फाडले, असा आरोप आ.धस यांनी केला.
नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीमध्ये घोटाळा
धनंजय मुंडे यांनी निविष्ठा खरेदीच्या बाबीत बदल करून एमएआयडीसीसाठी २६४ कोटी आणि यंत्रमाग महामंडळासाठी ७० कोटी असा भ्रष्टाचार केला.
नॅनो युरियाचा दर ११२ रुपये असताना तो २१२ रुपयांनी खरेदी केला. यात २१ कोटी २६ लाखांचा घोटाळा केला आहे.
नॅनो डीएपी ३०० रुपये प्रति ५०० मिलीबॅग या किंमतीला बाजारात मिळतो आणि यांनी तो ५९० रुपयांना घेतला. यात जवळपास ५६ कोटींचा भ्रष्टाचार केला.
आदल्या दिवशी अर्ज, दुसऱ्या दिवशी कर्ज
धनंजय मुंडे यांनी २८ मार्चला पैशांची मागणी केली आणि ३१ मार्चला त्वरित पैसे देण्यात आले.
महाराष्ट्राचे यंत्रमाग महामंडळ मर्यादित यांनी देखील ७७.८५ कोटी रुपयांची गरज असल्याचे पत्र कृषी आयुक्तांना २८ मार्च रोजी पाठवले आणि कृषी विभागाने ३१ मार्चला निर्गमित करून टाकले.
बॅटरी अपडेटेड स्प्रे पंपाची किंमत बाजारात १५०० रु. आहे. महामंडळाने ३,४२५ रुपयांनी खरेदी केले. यात ४५ कोटींचा भ्रष्टाचार झाला. आदल्या दिवशी अर्ज केला की दुसऱ्या दिवशी कर्ज मिळते, असेही आ. धस म्हणाले.