सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीने तर्क-वितर्क; धनंजय देशमुखांची संयमी भूमिका, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 10:02 IST2025-02-15T10:01:42+5:302025-02-15T10:02:13+5:30

धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत या भेटीविषयी आपली भूमिका मांडली आहे.

Suresh Dhas and Munde meeting sparked arguments Dhananjay Deshmukhs restrained stance | सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीने तर्क-वितर्क; धनंजय देशमुखांची संयमी भूमिका, म्हणाले...

सुरेश धस आणि मुंडेंच्या भेटीने तर्क-वितर्क; धनंजय देशमुखांची संयमी भूमिका, म्हणाले...

Dhananjay Deshmukh: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणावरून भाजप आमदार सुरेश धस हे मागील काही दिवसांपासून सातत्याने राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत होते. मात्र नुकतीच धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. या भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून वेगवेगळे तर्क-वितर्कही लढवले जात आहे. अशातच मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देत या भेटीविषयी आपली भूमिका मांडली आहे.

"सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट का घेतली, याबाबत अद्याप मला पूर्ण माहिती मिळालेली नाही. या दोघांमध्ये भेटीत काय चर्चा झाली, हे समजल्यावरच मी त्यावर व्यक्त होणं योग्य राहील. परंतु काहीही झालं तरी आपण न्यायाच्या भूमिकेत असून जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही," असं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

सुरेश धसांनी काय स्पष्टीकरण दिलं?

"मी स्वत: धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी गेलो होतो. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो होतो. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. लढ्यामध्ये मी त्यांच्या विरोधातच राहणार आहे," असं धस यांनी या भेटीवर स्पष्ट केले. याचबरोबर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. बावनकुळे यांच्यासोबत भेट झाली का, या प्रश्नावर बावनकुळे यांची माझी आता भेट होईल. बावनकुळे काय म्हणाले ते त्यांनाच बोला मला विचारू नका.  मी परवाच गेलेलो. तब्येतीची चौकशी करणे यात गैर नाही. संतोष देशमुख हत्येचा लढा आणि चौकशी यात कोणताही संबंध नाही, असं धस यांनी सांगितलं. 

दरम्यान,  मुंडे आणि धस यांच्या भेटीसाठी आपण मध्यस्थी केल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वत:च सांगितले. ही भेट आपल्या घरी झाल्याचे ते म्हणाले. चार-साडेचार तास आम्ही तिघे एकत्र होतो, असे ते माध्यमांशी बोलताना म्हणाले. ही भेट नेमकी कधी झाली असे विचारले असता, बावनकुळे यांनी तारीख, दिवसाचे काय करता? असा प्रतिप्रश्न केला. आ. सुरेश धस यांनी मात्र मुंडे यांच्या डोळ्याचे ऑपरेशन झाल्याने विचारपूस करण्यासाठी आपण मुंडे यांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेलो होतो, असे सांगितले.
 

Web Title: Suresh Dhas and Munde meeting sparked arguments Dhananjay Deshmukhs restrained stance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.