अचानक माकडसमोर आले अन रिक्षा उलटून खड्यात कोसळला; एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 19:30 IST2021-07-19T19:29:15+5:302021-07-19T19:30:32+5:30
Accident in Beed : काम करणाऱ्या महिला भेटत नसल्याने अनेक शेतकरी वाहनाद्वारे त्यांची येण्याजाण्याची सोय करतात.

अचानक माकडसमोर आले अन रिक्षा उलटून खड्यात कोसळला; एका महिला प्रवाशाचा जागीच मृत्यू
माजलगाव : तालुक्यातील लोणगाव येथे अचानक रिक्षासमोर माकड आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याची घटना सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली. रिक्षा उलटून गंभीर जखमी झालेल्या गजराबाई हारीभाऊ हजारे ( ६०) यांचा जागीच मृत्यू झाला.
सध्या पावसाने उघडीप दिल्याने शेतातील खुरपणीची कामे जोरात सुरू आहेत. शेतात काम करण्यासाठी मजुरांची वानवा आहे. काम करणाऱ्या महिला भेटत नसल्याने अनेक शेतकरी वाहनाद्वारे त्यांची येण्याजाण्याची सोय करतात. लोणगाव येथे सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास याच गावातील ऑटो रिक्षा लोणगाव - जीवनापूर रस्त्यावरून जात काही महिलांना घेऊन जात होता. यावेळी अचानक समोर माकड आल्याने चालकाचा रिक्षावरील ताबा सुटला. यामुळे रिक्षा उलटला आणि बाजूच्या खड्ड्यात पडला.
यावेळी रिक्षातील गजराबाई हजारे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्या जागीच मरण पावल्या. तर नंदिनी अशोक हजारे (१४) या मुलीच्या दोन्ही पायाला मार लागला आहे. तिच्यावर माजलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच अन्य २-३ महिला किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर लोणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार करून घरी पाठविण्यात आले.