कोरोनाचा फटका; हाँगकाँगला शिकणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थिनीला सुटकेची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2020 20:59 IST2020-03-13T20:54:39+5:302020-03-13T20:59:57+5:30
प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे तिची हाँगकाँगमधून सुटका होणे मोठ्या जिकिरीचं बनले आहे.

कोरोनाचा फटका; हाँगकाँगला शिकणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थिनीला सुटकेची प्रतीक्षा
अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई - उच्च शिक्षणासाठी अंबाजोगाई येथून हाँगकाँगला गेलेल्या विद्यार्थीनीची सुटका होईना झाली आहे. फिटनेस प्रमाणपत्राअभावी गेल्या तीन दिवसांपासून ती विमानतळावरच अडकून पडली आहे. प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे तिची हाँगकाँगमधून सुटका होणे मोठ्या जिकिरीचं बनले आहे.
अंबाजोगाई येथील प्रिया कमलाकर कांबळे ही विद्यार्थीनी हाँगकाँग येथे उच्च शिक्षणासाठी गेली आहे. १ सप्टेंबर २०१९ ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत ती पुर्णवेळ हाँगकाँग येथील विद्यापीठात शिक्षणासाठी रूजू झाली आहे. सध्या हाँगकाँग येथील त्या विद्यापीठाने कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याने सुट्टी जाहिर केली. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत प्रियाला भारतात यायचे आहे. परंतु 10 मार्चपासून ती हाँगकाँगच्याच विमानतळावर अडकून पडली आहे.
विमानतळ प्रशासन तिला फिटनेस सर्टिफीकेटची मागणी करत आहेत. मात्र, हे प्रमाणपत्र नेमके कोणाकडून घ्यायचे याचे तिला व्यवस्थित मार्गदर्शन ही होत नाही. तेथील भारतीय दुतावास कार्यालयास संपर्क करूनही अचुक व योग्य मार्गदर्शन होत नसल्याने ती तिथेच अडकूण पडली आहे. प्रिया ही अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची कन्या आहे. प्रा.कमलाकर कांबळे यांनी या संदर्भात बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांच्याकडे संपर्क साधला असून तिला भारतात आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती व प्रशासनाकडे त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.