"केस थांबवा, नाहीतर..."; बीडमध्ये संतोष देशमुख खून प्रकरणात कुटुंबियांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 18:17 IST2026-03-24T18:10:11+5:302026-03-24T18:17:18+5:30
सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांना वेगवेगळ्या अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून फोन येत आहेत.

"केस थांबवा, नाहीतर..."; बीडमध्ये संतोष देशमुख खून प्रकरणात कुटुंबियांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या खटल्याला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली, मात्र सुनावणीनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलेल्या एका आरोपाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. "आम्हाला आणि आमच्या नातेवाईकांना केस मागे घेण्यासाठी सतत धमकीचे फोन येत आहेत," असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.
सुनावणीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून त्यांना वेगवेगळ्या अनोळखी मोबाईल क्रमांकांवरून फोन येत आहेत. या फोनद्वारे संतोष देशमुख खून प्रकरणाचा पाठपुरावा थांबवण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे. इतकेच नाही तर, हा खटला न लढण्यासाठी कुटुंबाला धमकावण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार
धमकीच्या या प्रकारामुळे देशमुख कुटुंब सध्या दहशतीखाली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत धनंजय देशमुख यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना लेखी तक्रार दिली. ज्या क्रमांकांवरून धमकीचे फोन आले, त्यांची तातडीने चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कुटुंबाने केली आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच आता साक्षीदार आणि नातेवाईकांवर दबाव टाकण्याचे प्रकार समोर येत आहे.