परळीच्या चोरट्यांकडून यवतमाळमध्ये चोरी; पोलिसांनी केले पाच तोळे सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 14:39 IST2018-10-27T14:38:53+5:302018-10-27T14:39:15+5:30
यवतमाळमध्ये चोरी करून परळीत वास्तव्य करणाऱ्या चोरट्याच्या घरी अचानक धाड टाकली.

परळीच्या चोरट्यांकडून यवतमाळमध्ये चोरी; पोलिसांनी केले पाच तोळे सोने जप्त
बीड : यवतमाळमध्ये चोरी करून परळीत वास्तव्य करणाऱ्या चोरट्याच्या घरी अचानक धाड टाकली. यामध्ये तब्बल पाच तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. याचवेळी चोरट्याने घरातून पलायन केले. पाठलागानंतरही त्याला पकडण्यात अपयश आले. हा चोर-पोलिसाचा खेळ परळीतील इराणी गल्लीत शुक्रवारी पहावयास मिळाला.
परळी शहरातील इराणी गल्लीतील एका आरोपीने यवतमाळ जिल्ह्यात चोऱ्या केल्या होत्या. हा चोर परळी येथे असल्याची माहिती मिळताच यवतमाळ पोलिसांनी पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांना माहिती दिली. श्रीधर यांनी गुन्हे शाखेचे पोनि घनश्याम पाळवदे यांना कळविताच त्यांनी आपले पथक इराणी गल्लीत पाठविले. अचानक धाड टाकली. मात्र आरोपीने मागच्या दरवाजातून पलायन केले. पोलिसांनी त्याचा दुरपर्यंत पाठलाग केला. मात्र गल्लीबोळातून पसार होण्यात तो यशस्वी झाला. पोलिसांनी त्याच्या घरातून तब्बल पाच तोळे सोने जप्त केले आहे. आरोपीचाही लवकरच शोध घेऊ, असे पोनि घनश्याम पाळवदे म्हणाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजीद पठाण, सखाराम पवार, नरेंद्र बांगर यांनी केली.