'हे गोंधळलेले सरकार, काय सुरु, काय बंद करायचे कळेना'; टाळाच्या गजरात आमदार सुरेश धसांचे लक्षवेधी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2021 13:23 IST2021-08-30T13:20:00+5:302021-08-30T13:23:04+5:30
नेमके काय उघडायचे काय बंद करायचे या सरकारला कळत नाही, हे गोंधळलेले सरकार आहे.

'हे गोंधळलेले सरकार, काय सुरु, काय बंद करायचे कळेना'; टाळाच्या गजरात आमदार सुरेश धसांचे लक्षवेधी आंदोलन
आष्टी : राज्यात अस्तित्वात असलेले महाविकास आघाडीचे सरकार हे कपट कारस्तानाने आलेले सरकार आहे. मंदिर बंद करून सर्वात मोठे पाप हे सरकार करत आहे. धार्मिक स्थळे बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या लोकांची मोठी परवड होत आहे. मंदिरापेक्षा जास्त गर्दी जिथे होते असे रेस्टॉरंट बार चालू आहेत, अशी टीका आमदार सुरेश धस यांनी भाजपच्या धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागणीसाठीच्या शंखनाद आंदोलनात केली. यावेळी 'उद्धवा अजब तुझे सरकार, चालू बार अन मंदिर बंद' अशा घोषणा देत आ. सुरेश धस आणि आंदोलकांनी टाळाच्या गजरात ठेका धरला.
येथील श्रीराम मंदिर येथे भाजपने 'मंदिर हम खुलवायेंगे, धर्म को न्याय दिलायेंगे' अशा घोषणा देत शंखनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. धस म्हणाले की, व्यसनाच्या आहारी समाज मोठ्या प्रमाणावर चालला आहे. मुलाने आई मारल्याची घटना चौसाळा येथे घडली आहे. या दारूमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असे असताना मंदिर बंद करून मंदिरापेक्षा जास्त गर्दी होते.असे हाॅटेल रेस्टॉरंट बार सुरू केले आहेत. मंदिर बंद करायचे असेल तर हाॅटेल बार बंद करावेत. मंदिरावरती अवलंबून असलेल्या अनेक लोकांची मोठी परवड होत आहे. या सरकारला गोर गरीब, हातावर पोट असलेल्या लोकांचे काही घेणे देणे नाही. नेमके काय उघडायचे काय बंद करायचे या सरकारला कळत नाही, हे गोंधळलेले सरकार आहे. केवळ वसुलीच्या मागे सरकार लागले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
आंदोलनात सभापती बद्रीनाथ जगताप, सुनिल रेडेकर, रंगनाथ धोंडे, आत्माराम फुंदे, मनोज सुरवसे, संजय आजबे, सरपंच अतुल कोठूळे, विजय साठे यांच्यासह मोठ्या संख्येने भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झालीये होते.