सुसाट कारने दोन दुचाकींना उडवले; एक ठार, तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2022 17:13 IST2022-01-03T17:13:21+5:302022-01-03T17:13:54+5:30

अज्ञात कारने दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली, अंधाराचा फायदा घेत चालक न थांबता पुढे निघून गेला

speedy car blew up two bikes; One killed, three injured | सुसाट कारने दोन दुचाकींना उडवले; एक ठार, तीन जखमी

सुसाट कारने दोन दुचाकींना उडवले; एक ठार, तीन जखमी

दिंद्रुड (बीड ) : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड-मोहखेड रस्त्यावर एका अज्ञात सुसाट कारने दोन दुचाकींना उडवले. यात एक ठार व तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.०३) रात्री ८ वाजताच्या सुमारास झाला.  

धारूर तालुक्यातील हिंगणी खु. येथील भानुदास बालासाहेब पांचाळ (वय २६) व गोरक्षनाथ भाऊसाहेब पांचाळ ( ५०) हे दोघे रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून दिंद्रुडहून हिंगणीकडे निघाले होते. तर, बब्रुवाहन ज्ञानोबा दीक्षित (४०, रा. उंबराई, माजलगाव) आणि आकाश गुंडीबा सोनवणे (वय २७, रा. कासारी, ता. धारूर) हे दोघेही त्याचवेळी दुचाकीवरून जात होते. दिंद्रुड - मोहखेड रस्त्यावर या दोन्ही दुचाकींना भरधाव कारने उडवले. या अपघातात दोन्ही दुचाकीवरील चौघेही गंभीर जखमी झाले. 

दिंद्रुड पोलीसांनी घटना स्थळावर धाव घेत जखमींना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमीपैकी भानुदास पांचाळ यास अंबाजोगाईहून बीड येथील शासकीय रुग्णालयाकडे हलवण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. उर्वरित जखमींवर स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Web Title: speedy car blew up two bikes; One killed, three injured