भरधाव वेगातील वाळूच्या टिपरने दुचाकीला उडवले; तीन तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 23:52 IST2020-08-08T23:51:29+5:302020-08-08T23:52:34+5:30
अंबाजोगाई जवळ झाला भीषण अपघात

भरधाव वेगातील वाळूच्या टिपरने दुचाकीला उडवले; तीन तरुण जागीच ठार
अंबाजोगाई : परळीकडून वाळू घेऊन अंबाजोगाईच्या दिशेने निघालेल्या भरधाव वेगातील टिपरने दिलेल्या धडकेत तीन तरुण जागीच ठार झाले. हा भीषण अपघात अंबाजोगाई-परळी रोडवरील काळवीट तांडा परिसरात शनिवारी (दि.०८) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास झाला. मयत तिघेही तरुण परळी तालुक्यातील वानटाकळी येथील आहेत.
नागनाथ महादेव गायके (वय ३५), वसंत जनार्दन गायके (वय ४५) आणि विठ्ठल मुंजाजी गायके (वय २३) अशी अपघातातील मयत तरुणांची नावे आहेत. हे तिघेजण शनिवारी रात्री दुचाकीवरून (एमएच १३ बीडी ५६८४) गावाकडे निघाले होते. ते काळवीट तांडा परिसरात आले असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या वाळूच्या टिपरने (एमएच २५ यु २४४४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता कि दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरिक्षक महादेव राऊत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.
लॉकडाऊनमधेही वाळूची अवैध वाहतूक सुरूच :
दरम्यान, लॉकडाऊन सुरु असतानाही वाळू माफिया मात्र कुठलेही निर्बंध पाळत नसल्याचे आजच्या अपघाताने पुन्हा एकदा उघड झाले आहे. रात्रीच्या वेळी परळीहून पठाण मांडवा मार्गे अनेक गाड्या अंबाजोगाईच्या दिशेने येत असतात. लॉकडाऊनमध्येही वाळूची अवैध वाहतूक अव्याहतपणे सुरु आहे. सर्वसामान्य नागरिकांना लॉकडाऊनमुळे कायद्याचा बडगा दाखविणाऱ्या प्रशासनाची वाळू माफियांबद्द्ल बोटचेपी भूमिका कशासाठी असा सवाल नागरिक करत आहेत.