"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 17:32 IST2025-09-17T17:20:50+5:302025-09-17T17:32:48+5:30
बीड जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलताना पंकजा मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना टोला लगावला.

"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
Pankaja Mundhe On Beed Railway: गेल्या ४० वर्षांपासून रखडलेले बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न आज अखेर पूर्ण झालं. बीड जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाचं आज लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पंकजा मुंडे यांच्यासह स्थानिक आमदार, खासदार उपस्थित होते. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी बीडच्या विकासकामांवरुन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांना टोला लगावला. बजरंग सोनवणे तुम्ही भाग्यवान आहात असं म्हणत पंकजा मुंडे यांनी चिमटा काढला.
अहिल्यानगर ते बीड रेल्वे सेवेला बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रेल्वे सेवेचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी नेत्यांनी भाषणं केली. मंत्री पंकजा मुंडे यांनीही भाषण करताना सर्वांचे आभार मानले. यासह लोकसभा निवडणूक पराभव करणाऱ्या बजरंग सोनवणे यांच्याबाबतही भाष्य केलं.
"मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं की, एकवेळ माझं नाव घेतलं नाही तरी चालेल. पण आमच्या प्रीतम ताईंचे नाव याच्यामध्ये आवर्जून घ्या. ही रेल्वे प्रत्यक्षात उतरली. बजरंग बाप्पा तुम्ही तर खूप भाग्यवान आहात. नांगरलं कुणी, पेरलं कुणी आणि कापणीच्या वेळी बाप्पा आले. पण मला आनंद आहे की तुम्ही रेल्वेच्या विकासासाठी आणखी प्रयत्न करत आहात. त्यासाठी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिल्याशिवाय राहणार नाही," असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
अजितदादा तुम्ही बीडमध्ये या - पंकजा मुंडे
"दादांच्या कामाचा सपाटा सर्वांनाच माहिती आहे. त्यांची पद्धतही माहिती आहे. दादा तुम्ही बीड जिल्ह्यात दर आठवड्याला या, सर्वांना सकाळी लवकर उठायची सवय लागेल. दादा तुमच्याप्रमाणे मी देखील थोडं थोडं केलं. मी पण आज सकाळी ७ वाजता पूरग्रस्तांसाठी दौरा केला. जर आपण असेच पुढे गेलो तर या जिल्ह्याच्या विकासाला कुठेही गालबोट लागणार नाही," असे पंकजा मुडें म्हणाल्या.