परळीत रबरी ट्यूबमधून १२०० लिटर गावठी दारूची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 18:35 IST2020-10-12T18:33:07+5:302020-10-12T18:35:37+5:30
Smuggling of 1200 liters of Gawathi liquor through rubber tube in Parli 1200 लिटर गावठी दारू आटोरिक्षासह पोलिसांनी जप्त केली

परळीत रबरी ट्यूबमधून १२०० लिटर गावठी दारूची तस्करी
परळी: शहरातील सुभाष चौकात हातभट्टी दारूची वाहतूक करणारा एक ऑटोरिक्षा संभाजीनगर पोलिसांनी सोमवारी सकाळी ११.३० वाजता ताब्यात घेतला. यावेळी त्यात बारा रबरी ट्यूबमध्ये दारू भरल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सर्व ट्यूबमधील जवळपास बाराशे लिटर दारू जप्त करून नष्ट केली. याप्रकरणी दोघांविरुद्ध संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, परळी तालुक्यातील दारावती तांडा येथे विना परवाना बेकायदेशीर रित्या गावठी दारूची अवैधपणे निर्मिती केली जाते .ही दारू ऑटोरिक्षातुन रबरी ट्युब मध्ये घेऊन येत असल्याची माहिती संभाजीनगर पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, जमादार व्यंकट भताने, पोलीस नाईक दत्ता गीते ,अर्जुन राठोड , मोहन दुर्गे यांनी सुभाष चौकात नाकाबंदी केली. यावेळी सिद्धार्थनगर कडून एक आटो रिक्षा येत असलेला पोलिसांना दिसला. पोलिसांना पाहताच रिक्षातील एक जण पळून गेला, तर चालक व रिक्षातील गावठी दारू पोलिसांनी ताब्यात घेतली. चालकाचे नाव शिवाजी साहेब राठोड ( रा दारावती तांडा ) असे असल्याचे सूत्रांनी सांगितले. रिक्षाचा क्रमांक एम एच 22 - एच 23 19 असा आहे. तर संशयित फरार आरोपीचे नाव शिवाजी रूपा राठोड ( रा. दारावती तांडा ) असे असल्याची माहिती आहे.
लॉकडाऊन काळातील कारवाईनंतर पुन्हा सक्रीय
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दारूचे गाळप चालूच आहे. पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी ग्रामीण पोलिसांनी लॉकडाऊन काळात गावठी दारूचे अड्डे उध्वस्त करून गुन्हे दाखल केले होते. यानंतरही पुन्हा बेकायदेशीररीत्या गावठी दारूचे उत्पादन सुरूच आहे. दारावती तांडा येथे तयार केलेली दारू परळी शहरासोबत आजूबाजूंच्या तालुक्यातही विक्रीसाठी पाठवली जात असल्याची माहिती आहे.