श्रावण सोमवार आणि विनायक चतुर्थीचा संयोग; वैद्यनाथ मंदिर सजवले फुलांनी, भक्तांची अलोट गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:21 IST2025-07-28T14:21:06+5:302025-07-28T14:21:28+5:30
वैद्यनाथ मंदिरात तगडा पोलिस बंदोबस्त, भाविकांसाठी दर्शन रांग आणि विशेष पास रांग सुविधा

श्रावण सोमवार आणि विनायक चतुर्थीचा संयोग; वैद्यनाथ मंदिर सजवले फुलांनी, भक्तांची अलोट गर्दी
- संजय खाकरे
परळी: देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिगाच्या दर्शनासाठी पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची अलोट गर्दी झाली आहे . मंदिरात विविध फुलांची मनमोहक सजावट करण्यात आले असून ध्वनीकरणाद्वारे. ॐ नमः शिवाय ची धून जप सुरू करण्यात आला आहे. मध्यरात्री बारा वाजल्यापासून दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे. हर हर महादेव, प्रभू वैद्यनाथ भगवान की जय, ओम नमः शिवाय जयघोष करीत सकाळी दहा वाजेपर्यंत हजारो शिवभक्तांनी प्रभुवैद्यनाथाचे मनोभावे दर्शन घेतले. देशभरातून भाविक दर्शनासाठी परळीत आले आहेत. प्रभू श्री वैद्यनाथ मंदिर व मंदिरातील इतर ज्योतिर्लिंगाचे प्रतिकृती असलेल्या मंदिरातही भाविकांची गर्दी झाली. परळी व परिसरातील महादेवाचे मंदिरही गजबजले आहेत.
विनायक चतुर्थी व श्रावण सोमवार असा योग आल्याने श्री वैद्यनाथ मंदिरात भाविकांची संख्या वाढली आहे. महिलांनी तांदळाची पहिली शिवमुठ व बिल्वपत्र अर्पण करून प्रभू श्री वैद्यनाथ भगवानाचे दर्शन घेतले. वैद्यनाथ मंदिरात श्रावण सोमवारच्या अनुषंगाने महिला व पुरुष अशी धर्मदर्शन रांग व पासधारक अशा स्वतंत्र तीन रांगा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे हजारो शिवभक्तांचे दर्शन शांततेत व सहज होत आहे. वैद्यनाथ मंदिर परिसरात साडेतीनशे पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलिस, होमगार्ड, राज्य राखीव दल, असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. धर्मदर्शन रांगेमध्ये दोन तासाच्या आत दर्शन होत आहे तर पासच्या रांगेमध्ये एक तासाच्या आत दर्शन होत असल्याचे भाविकांनी सांगितले. श्रावण सोमवारी आमदार व माजी मंत्री धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने श्री वैद्यनाथ मंदिरात 25 क्विंटल झेंडू ,गुलाब ,निशिगंधा व अष्टर या फुलांनी मनमोहक सजावट करण्यात आली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे त्यामुळे मंदिर झगमगटत आहे.
वैद्यनाथ मंदिर परिसरातील प्रसाद साहित्याच्या दुकानावर भाविकांची गर्दी आहे .श्री वैद्यनाथ मंदिर भाविकांच्या गर्दीने फुलले आहे. रविवारी रात्री महाराष्ट्र, उत्तर प्रदेश ,कर्नाटका ,आंध्र प्रदेश येथील भाविकांनी दर्शन घेतले .पहिल्या श्रावण सोमवारी राज्य व राज्यातून भाविक दर्शनासाठी परळी नगरीत आले आहे. श्रावण महिन्यानिमित्त श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री वैद्यनाथ मंदिरात ध्वनिकर्णद्वारे ओम नमः शिवाचा धून जप 24 तास चालू आहे. त्यामुळे वातावरण भक्तीमय झाले आहे.