हवेत गोळीबार झाला अन् दरोडेखोर आल्यापाऊली माघारी फिरले; ग्रामस्थांनी तिघांना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 16:49 IST2024-08-16T16:47:00+5:302024-08-16T16:49:35+5:30
या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ताब्यातील तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

हवेत गोळीबार झाला अन् दरोडेखोर आल्यापाऊली माघारी फिरले; ग्रामस्थांनी तिघांना पकडले
- नितीन कांबळे
कडा ( बीड) : आज पहाटे तीन वाजेच्या दरम्यान दरोड्याच्या तयारीत आलेल्या सहा जणांनी घरचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत सोनेनाणे काढून द्या, आरडाओरड करू नका अशी, धमकी देत धिंगाणा घातला. मात्र, घरमालकाने समयसूचकता दाखवत परवानाधारक रायफलमधून हवेत गोळीबार केला. यामुळे दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. दरम्यान, गस्तीवरील ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून तिघे पसार झाली आहेत. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध शुक्रवारी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी तालुक्यातील किन्ही व केरूळ परिसरात दरोड्याच्या घटना घडल्याने पोलिस ॲक्शन मोडवर आले होते. तर काही गावातील ग्रामस्थांनी गस्त सुरू केली. पोलिसही डोळ्यात तेल घालून दरोडेखोरांच्या मागावर होते. शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान चोभानिमगांव येथील सतीश झगडे यांच्या घरी कोयता, लोंखडी गज, करवत घेऊन सहा जणांनी दरोड्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा न करता घरातील रोकड, दागिने हवाली करण्याची धमकी दरोडेखोरांनी दिली. मात्र, झगडे यांनी प्रसंगावधान राखत परवानाधारक रायफलमधून हवेत गोळीबार केला. गोळीबार होताच दरोडेखोर माघारी फिरल्याने अनर्थ टळला.
दरम्यान, जिवाच्या आकांताने दुचाकीवरून सुसाट निघालेल्या दरोडेखोरांना भवरवाडी रस्त्यावर गस्तीवरील ग्रामस्थांनी अडवले. यावेळी तिघांनी तेथून पळ काढला तर तिघांना ग्रामस्थांनी पकडले. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तिन्ही दरोडेखोरांना ताब्यात घेतले. सतीश झगडे याच्या फिर्यादीवरून शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यातील रोहित शंकर मोरे, किरण गुलाब मोरे, अजय सुखदेव शिंदे, अक्षय पवार, विशाल बर्डे, गुलाब मोरे या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ताब्यातील तिन्ही दरोडेखोरांना आष्टी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास आष्टीचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे करीत आहेत.