धक्कादायक ! अत्याचार प्रकरणातील आरोपी हातकडीसह पोलिसांच्या ताब्यातून पळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2022 19:56 IST2022-06-30T19:54:10+5:302022-06-30T19:56:23+5:30
बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावरील गारमाथा येथील घटना

धक्कादायक ! अत्याचार प्रकरणातील आरोपी हातकडीसह पोलिसांच्या ताब्यातून पळाला
- नितीन कांबळे
कडा (बीड) : पोलीस ठाण्यात नेण्यात येत असलेला अत्याचार प्रकरणातील आरोपी हातकडीसह पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास गारमाथा येथे घडली. विकास गायकवाड (२४,बीडसांगवी ) असे आरोपी नाव आहे. तो २०१९ पासून एका अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांना हवा होता.
आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे २०१९ मध्ये एका अत्याचार प्रकरणात विकास कैलास गायकवाड हा आरोपी आहे. तो अंभोरा पोलिसांना अनेक महिन्यांपासून गुंगारा देत होता. मात्र, पोलिसांनी त्याला बुधवारी बीड येथून ताब्यात घेतले होते. गुरूवारी बीडवरून पोलीस त्याला अंभोरा पोलिस ठाण्यात घेऊन जात होते. बीड-धामणगांव-नगर राज्य महामार्गावरील गारमाथा येथे गाडी लघुशंकेसाठी थांबवली. यावेळी आरोपी विकास गायकवाड हा पोलिसांच्या हाताला झटका देऊन हातकडीसह पळाला. पोलिसांनी पाठलाग केल्यानंतरही आरोपी मिळून आला नाही. गंभीर गुन्ह्यातील आरोपी ताब्यात ठेवण्यात पोलिस कमी पडल्याचे दिसून आले.