धक्कादायक ! जमिनीच्या वादातून वृद्धाची दगडाने ठेचून केली सख्ख्या भावानेच हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 19:21 IST2020-04-23T19:17:57+5:302020-04-23T19:21:03+5:30
सख्खा भाऊ, भावजयसह दोन पुतण्यांवर गुन्हा

धक्कादायक ! जमिनीच्या वादातून वृद्धाची दगडाने ठेचून केली सख्ख्या भावानेच हत्या
दिंद्रुड ( माजलगाव ) : शेतजमिनीच्या वादाचे कारण पुढे करत सख्ख्या भावाच्या कुटुंबाने ६५ वर्षीय वृद्धाला दगड, विटांनी बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी सायंकाळी धारूर तालुक्यातील हिंगणी खुर्द येथे घडली होती. या मारहाणीत जबर जखमी झालेल्या वृद्धाचा गुरुवारी सकाळी ६ वाजता अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ज्ञानोबा ग्यानबा सोळंके (वय ६५, रा. हिंगणी खु., ता. धारूर) असे त्या मयत वृद्धाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता ते शेतातून घरी येत असताना घराजवळ त्यांना भाऊ मधुकर ग्यानबा सोळंके, शामल मधुकर सोळंके, सिद्धेश्वर मधुकर सोळंके आणि दयानंद मधुकर सोळंके यांनी अडविले. जमिनीच्या कारणावरून त्यांच्यात वाद सुरु झाला. यावेळी शामल सोळंके हिने, यांनीच आपली जमीन हडपली यांना मारा असे म्हणाली. त्यानंतर सिद्धेश्वर, दयानंद आणि मधुकर यांनी ज्ञानोबा सोळंके यांना दगड, विटांनी बेदम मारहाण केली. भांडणाची माहिती मिळाल्यानंतर ज्ञानोबा यांच्या मुलाने आणि इतर ग्रामस्थांनी मध्यस्थी करत ज्ञानोबा यांची सुटका केली आणि त्यांना तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान ज्ञानोबा सोळंके यांचा गुरुवारी सकाळी ६ वाजता मृत्यू झाला.
दिंद्रुड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक विठ्ठल शिंदे आणि पो.ना. सोनवणे, सरवदे यांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्व. याप्रकरणी रवी अरुण सोळंके यांच्या फिर्यादीवरून चारही आरोपींवर दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपी फरार झाले आहेत. पुढील तपास सहा. पोलीस निरिक्षक अनिल गव्हाणकर हे करत आहेत.