धक्कादायक ! कोविड सेंटरमध्ये दारूच्या नशेत कर्मचाऱ्याचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 17:30 IST2020-11-21T17:27:57+5:302020-11-21T17:30:02+5:30
नशेतील या कर्मचाऱ्यास लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले.

धक्कादायक ! कोविड सेंटरमध्ये दारूच्या नशेत कर्मचाऱ्याचा गोंधळ
केज : येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या पशुसंवर्धन विभागातील परिचर पदावर कार्यरत कर्मचाऱ्याने बुधवारी रात्री दारू पिऊन कोविड सेंटरमध्ये धिंगाणा घातला. त्यानंतर नशेतील या कर्मचाऱ्यास लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. ही माहिती केज उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी ‘लोकमत’ला दिली.
तालुक्यातील पशुसंवर्धन विभागात परिचर असलेल्या कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाल्याने त्यास पाच- सहा दिवसांपूर्वी पिसेगाव येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. दीपावलीचा सण असल्याने घरचा जेवणाचा डबा दिला जात असल्याने कोविड सेंटरमधील अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला नाही. मात्र, सदर कर्मचाऱ्यास बुधवारी सायंकाळी जेवणाचा डबा देताना सोबत दारूही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आलेली दारू प्राशन केल्याने नशा चढलेल्या कर्मचाऱ्याने कोविड सेंटरमध्ये धिंगाणा घातला. या कृत्याने सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या अन्य महिलांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. असा प्रकार होऊ नये अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
दारू कोणी पुरविली ? प्रश्न अनुत्तरित
रुग्णांनी वैद्यकीय अधिकाऱ्याकडे तक्रार करताच या कर्मचाऱ्यास लोखंडी सावरगाव येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. तो कोरोनाबाधित असल्याने कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. कोविड सेंटरमध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या कर्मचाऱ्यास जेवणाच्या डब्यातून दारू कोणी पुरवली, हे मात्र अनुत्तरित आहे.