बीडमधील धक्कादायक घटना! पत्नीच्या मारहाणीत अवघड जागी मार, दिव्यांग पतीचा जीव गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 19:08 IST2025-09-13T19:06:58+5:302025-09-13T19:08:18+5:30

पत्नीच्या मारहाणीत दिव्यांग पतीचा मृत्यू; अंबाजोगाई शहरातील घटना, गुन्हा दाखल

Shocking incident in Beed! Disabled husband dies after being hit on sexual organ spot while being beaten by his wife | बीडमधील धक्कादायक घटना! पत्नीच्या मारहाणीत अवघड जागी मार, दिव्यांग पतीचा जीव गेला

बीडमधील धक्कादायक घटना! पत्नीच्या मारहाणीत अवघड जागी मार, दिव्यांग पतीचा जीव गेला

अंबाजोगाईत (बीड): कौटुंबिक वादातून पत्नीने पतीला लाथा-बुक्क्यांनी केलेल्या मारहाणीत अवघड जागी मार लागल्याने दिव्यांग पती कैलास सरवदे (वय ३७) यांचा मृत्यू झाल्याची घटना अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर भागात बुधवारी घडली. या प्रकरणी पत्नीवर अंबाजोगाई शहर ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कैलास यांची बहीण ज्योती तरकसे यांनी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, कैलास सरवदे यांचे लग्न सात वर्षांपूर्वी माया हिच्याशी झाले होते. मायाचे हे दुसरे लग्न आहे. पहिल्या पतीपासून तिला दोन मुली, तर कैलासपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. कैलास हा दिव्यांग आणि दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने त्याचे पत्नीबरोबर वाद होत होते. माया ही कैलास याला नेहमी उपाशी ठेवत असे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात माया सरवदे हिच्यावर बीएनएस कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय रविकुमार पवार करीत आहेत.

वाद सोडवण्यासाठी आलेल्या शेजाऱ्यांनाही शिवीगाळ
१० सप्टेंबर रोजी दुपारी अडीच वाजता कैलास दारू पिऊन घरी आल्यांनतर दोघांत पुन्हा वाद झाला. मायाने संतापाच्या भरात कैलासला खाली पाडून पोटावर व अवघड जागी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर काही वेळाने कैलास घराशेजारी बेशुद्ध पडलेला दिसला. कुटुंबातील लोक, शेजाऱ्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता मायाने हस्तक्षेप करू नका, दररोज हा दारू पिऊन असाच करतो, मी याला फुकट सांभाळायचे का, असे म्हणत त्यांनाही शिवीगाळ केली.

शवविच्छेदन अहवालातही तशीच नोंद
नातेवाइकांनी कैलास याला ऑटोरिक्षाने सरकारी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. कैलास याचा मृत्यू दारूच्या अतिसेवनामुळे झाला, असा सुरुवातीला समज होता. मात्र, ११ सप्टेंबर रोजी झालेल्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीत अवघड जागी झालेल्या गंभीर दुखापतीमुळे कैलास याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

Web Title: Shocking incident in Beed! Disabled husband dies after being hit on sexual organ spot while being beaten by his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.