धक्कादायक ! चार महिन्याच्या गर्भवती पत्नीची दारूच्या नशेत गळा आवळून केली हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 11:00 IST2019-03-11T10:58:50+5:302019-03-11T11:00:05+5:30
हत्येनंतर पतीने रुग्णवाहिका बोलावून घेतली

धक्कादायक ! चार महिन्याच्या गर्भवती पत्नीची दारूच्या नशेत गळा आवळून केली हत्या
केज ( बीड ) : तालुक्यातील बनसारोळा येथे चार महिन्याची गरोदर असलेल्या पत्निचा दारुड्या पतिने खुन केल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. यानंतर पत्निस बाळांतपणासाठी घेऊन जायचे आहे असे सांगून त्याने रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका आल्यानंतर तपासणीनंतर हा प्रकार उघडकीस आला.
या बाबतीत अधिक माहिती अशी की, कळंब तालुक्यातील खामसवाडी मोहा येथील काजल हिचा तिन वर्षापुर्वी बनसारोळा येथील ज्ञानेश्वर गोरे समवेत विवाह झाला होता. विवाहा नंतर काही दिवस सुखाचे गेल्या नंतर गोरे दाम्पत्यास एक मुलगी झाली होती. कोमल दुसर्यांदा चार महिन्याची गरोदर होती
विवाहानंतर ज्ञानेश्वरला दारूचे व्यसन जडले होते. रविवार ज्ञानेश्वर दारु पिऊन आल्याने दिवसभर पत्निस मारहाण करत होता. त्यातच रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास नळास पाणी आल्याने पत्नी काजल ही पाणी भरण्यासाठी जात असताना पती ज्ञानेश्वर गोरेने तिस मारहाण करत तिचा गळा दाबून खून केला.
खुन केल्यानंतर ज्ञानेश्वरने 108 नंबरवर फोन करुन पत्नीस बाळांतपणासाठी घेऊन जायचे आहे असे सांगून रुग्णवाहिका बोलावुन घेतली. रुग्णवाहिका आल्यानंतर डाॅक्टरांनी तपासणी केली असता काजल मृत आढळून आली. त्यांनी ही माहिती युसूफवडगाव पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी रात्री बनसारोळा येथे धाव घेत मयत काजल हिचे शवविच्छेदन करण्यासाठी शव अंबाजोगाई येथे नेण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
दरम्यान, घटनेनंतर ज्ञानेश्वर गोरे (माळी) हा फरार झाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मयत काजल हिस आई वडील नसल्याची माहिती ही ग्रामस्थांनी दिली आहे. याप्रकरणी युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे फौजदार सुनिल अंधारे यांनी शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे सांगितले.