धक्कादायक ! तळणेवाडी कालव्यात सहा महिन्यांच्या बालिकेचे शव आले वाहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 17:05 IST2020-03-12T16:35:24+5:302020-03-12T17:05:19+5:30
बुधवारी सायंकाळी नागरिकांना आले निदर्शनास

धक्कादायक ! तळणेवाडी कालव्यात सहा महिन्यांच्या बालिकेचे शव आले वाहत
गेवराई :- तालुक्यातील तळणेवाडी जवळील जायकवाडीच्या उजव्या कालव्यात एका सहा महिन्यांच्या बालिकेचे शव वाहत आल्याची धक्कादायक घटना बुधवारी ( दि. ११ ) सायंकाळी उघडकीस आली. बालिकेची ओळख अद्याप पटली नसून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील तळणेवाडी शिवारातील उजव्या कालव्यात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कालव्यातून एका बालिकेचे शव वाहत येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ व पोलीस संतोष गाडे,सुशेन पवार यांनी घटना स्थळी जाऊन पंचनामा केला. बालिकेचे वय अंदाजे ६ महिने असून रंग सावळा आहे. अंगामध्ये पांढरा व निळ्या रंगाचा फ्रॉक, दोन्ही हातामध्ये काळ्यापांढर्या रंगाच्या मन्याचे मनगटे आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ हे करित आहेत.