धक्कादायक: ऊसतोडीला जाण्यापूर्वी ८४३ महिलांची काढली गर्भपिशवी; ३,४१५ महिलांना रक्तक्षय

By सोमनाथ खताळ | Updated: June 2, 2025 07:57 IST2025-06-02T07:57:11+5:302025-06-02T07:57:39+5:30

१,५२३ गर्भवती महिलांनी केले उसाच्या फडात काम

Shocking: 843 women had their wombs removed before going to sugarcane harvesting; 3,415 women suffered from anemia | धक्कादायक: ऊसतोडीला जाण्यापूर्वी ८४३ महिलांची काढली गर्भपिशवी; ३,४१५ महिलांना रक्तक्षय

धक्कादायक: ऊसतोडीला जाण्यापूर्वी ८४३ महिलांची काढली गर्भपिशवी; ३,४१५ महिलांना रक्तक्षय

सोमनाथ खताळ, लोकमत न्यूज नेटवर्क, बीड: ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधून प्रत्येकवर्षी १ लाख ७५ हजार मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात. यापैकी ७८ हजार महिला मजूर आहेत. त्यातील ८४३ महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात ३० ते ३५ वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे. तसेच, १,५२३ महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करत असल्याचे उघड झाले आहे.

जिल्ह्यातील ऊसतोड मजूर हे दिवाळीच्या दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात कामासाठी जातात. सहा महिने ऊसतोडणी करून ते डिसेंबर, जानेवारी महिन्यात परत येतात. आरोग्य विभागाकडून ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्याप्रमाणे आता याचा अहवाल तयार झाला आहे. यात महिलांना विविध आजार असल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी राज्यस्तरावरून बैठकही घेण्यात आली आहे.

३० ते ३५ वयोगटातील ४७७ महिलांची काढली गर्भपिशवी

ऊसतोडीला जाण्यापूर्वी जिल्ह्यातील ८४३ महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली. त्यातही ३० ते ३५ वयोगटातील ४७७ महिलांची शस्त्रक्रिया झाली आहे. अंगावरून जाणे, मासिक पाळीत रक्तस्राव होणे, जंतुसंसर्ग, पोटात दुखणे अशी लक्षणे या महिलांना असल्याचे सांगण्यात आले.

पोटात बाळ अन् दुसरीकडे पोटासाठी हाती कोयता

जिल्ह्यातील १,५२३ महिलांनी गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम केले. पोटात बाळ आणि पोटासाठी हाती कोयता, असा संघर्ष त्यांचा होता. या सर्व महिलांची नोंद माता व बाल संगोपन पोर्टलवर झाली आहे.

३,४१५ महिलांना रक्तक्षय

लोहाची कमतरता, बी-१२ आणि फॉलिक अँसिडची कमतरता, थलसेमिया, मासिक पाळी, शस्त्रक्रिया किंवा इतर कारणांमुळे रक्तस्राव झाल्यास रक्तक्षय होतो. असाच त्रास असणाऱ्या ऊसतोड महिलांची संख्या ३,४१५ एवढी आहे.

  • १,१३२ गावांत महिला आरोग्य कृती दल कार्यरत
  • ४६,२३१ महिलांची ऊसतोडीला जाताना तपासणी
  • एकूण महिलांना झाले आहे हेल्थ कार्डचे वाटप
  • १५,६२४ सरकारी डॉक्टरांची परवानगी घेऊन २७९ शस्त्रक्रिया खासगीत झाल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.


ऊसतोडीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. ८४३ महिला कामगारांची गर्भपिशवी शस्त्रक्रिया आणि १,५२३ महिला गर्भवती आहेत, हे खरे आहे.
-डॉ. सचिन शेकडे, माता व बाल संगोपन अधिकारी, बीड

Web Title: Shocking: 843 women had their wombs removed before going to sugarcane harvesting; 3,415 women suffered from anemia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.