धक्कादायक ! १५ महिन्यात ६५१ महिलांच्या काढल्या गर्भपिशव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 05:02 PM2021-08-03T17:02:34+5:302021-08-03T17:13:59+5:30

खाजगीत शस्त्रक्रिया करायची असेल तर जिल्हा शल्य चिकित्सक अथवा वैद्यकीय अधीक्षकांची परवानगी बंधनकारक

Shocking! 651 fetuses removed in 15 months at Beed | धक्कादायक ! १५ महिन्यात ६५१ महिलांच्या काढल्या गर्भपिशव्या

धक्कादायक ! १५ महिन्यात ६५१ महिलांच्या काढल्या गर्भपिशव्या

googlenewsNext
ठळक मुद्देसरकारीपेक्षा खाजगीत दुप्पट शस्त्रक्रिया गरज नसतानाही महिलांना पाठविले सीएसकडे

बीड : जिल्ह्यातील गर्भपिशवी काढण्याचे प्रमाण अद्यापही थांबलेले नाही. गरज नसतानाही काही महिलांना परवानगी घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठविले जात असल्याचे सोमवारी दिसले. तपासणी केल्यानंतर गरज नसल्याचे सिद्ध झाले. याच अनुषंगाने माहिती घेतली असता मागील १५ महिन्यात जिल्हाभरात तब्बल ६५१ महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारीपेक्षा खाजगीतील आकडेवारी दुप्पट असल्याचे दिसते.

जिल्ह्यातील महिलांच्या गर्भपिशवी काढण्याचे प्रकरण राज्यभर गाजले. या शस्त्रक्रिया करण्यासाठी मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी करण्यात आली. खाजगीत शस्त्रक्रिया करायची असेल तर जिल्हा शल्य चिकित्सक अथवा वैद्यकीय अधीक्षकांची परवानगी बंधनकारक केली. त्यामुळे खाजगीतून महिला आली तरी तिची पुन्हा तपासणी केली जात आहे. त्यानंतरच परवानगी द्यायची की नाही, हे निश्चीत करण्यात येते. त्यामुळे खाजगी डॉक्टरांकडून होणारी लूट काही प्रमाणात थांबली होती. असे असले तरी शस्त्रक्रियांचा आकडा काही केल्या कमी होत नसल्याचे दिसत आहे. मागील १५ महिन्यात तब्बल ६५१ महिलांची गर्भपिशवी काढण्यात आली आहे. या सर्वांना परवानगी दिल्याची नोंद आहे.

सीएसने नाकारली परवानगी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्याकडे सोमवारी दुपारी दोन महिला शस्त्रक्रिया परवानगीसाठी आल्या. त्यातील एका महिलेला तपासणी केल्यानंतर खरोखरच आवश्यकता असल्याने परवानगी देण्यात आली. तर दुसऱ्या महिलेला परवानगी नाकारण्यात आली. यावरून खाजगी डॉक्टर आवश्यकता नसतानाही गर्भपिशव्या काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे सिद्ध होते.

कोरोनाचा घेतला फायदा
कोरोना असल्याने नॉन कोवीड रूग्ण व शस्त्रक्रिया थांबविण्यात आल्या होत्या. याचा खाजगी डॉक्टरांनी फायदा घेतला. बीड जिल्हा रूग्णालयात केवळ ४ शस्त्रक्रिया झाल्या तर याच तालुक्यात खाजगीत तब्बल १८९ गर्भपिशवी काढण्यात आल्या. यावरून सर्व प्रकाराची प्रचिती समोर येते.

आवश्यकता असणाऱ्यांनाच परवानगी
आवश्यकता असणाऱ्यांनाच गर्भपिशवी शस्त्रक्रियाची परवानगी दिली जाते. एप्रिल २०२० ते जून २०२१ पर्यंत खाजगीत ४१० तर सरकारीत २४१ महिलांची गर्भपिशवी शस्त्रक्रिया झाल्या आहेत. सरकारीमध्येही शस्त्रक्रिया होत आहेत. परंतू काही गैरसमजुतीमुळे नागरिक खाजगीत धाव घेतात. नागरिकांनी सरकारीवर विश्वास ठेवून शस्त्रक्रिया कराव्यात.
डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड


अशी आहे आकडेवारी : 
खाजगीतील शस्त्रक्रिया -

बीड 189
परळी 84
आष्टी 6
केज 6
---
सरकारीतील शस्त्रक्रिया -
स्वाराती, अंबाजोगाई 232
जिल्हा रूग्णालय 4
उपजिल्हा रूग्णालय परळी 4
उपजिल्हा रूग्णालय केज 1
----
खाजगीतील एकूण शस्त्रक्रिया ४१०
सरकारीतील एकूण शस्त्रक्रिया २४१

Web Title: Shocking! 651 fetuses removed in 15 months at Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.